*’अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेस’चे १५ डिसेंबरपर्यंत सदस्य नोंदणी अभियान*
मुंबई,
“काँग्रेस पक्षात विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग आधीपासूनच आहे परंतु आता प्रोफेशनल काँग्रेस हे एक स्वतंत्र व्यासपीठ असून डॉक्टर, अभियंते, वकील यांच्याबरोबरच खेळाडू, कलाकार यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनीही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. १५ डिसेंबपर्यंत सदस्य नोंदणी करून काँग्रेसबरोबर या.” असे आवाहन अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसच्या पल्लवी नायक यांनी केले आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पल्लवी नायक म्हणाल्या की, “प्रोफेशनल काँग्रेस हे महत्वाचे राष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ असून याचे जिल्ह्यापर्यंत सदस्य आहेत. सध्या आयटी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात कामाचा ताण तणाव प्रचंड आहे, नोकरीची शाश्वती नाही तसेच सामाजिक सुरक्षाचे मुद्दाही आहे. आयटी क्षेत्रातील बेभरवशाची नोकरी व कामाचा प्रचंड ताण यामुळे काहीजण आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेत आहेत, हे अत्यंत गंभीर असून या क्षेत्रातील लोकांसाठी प्रोशेनल काँग्रेस हे महत्वाचे व्यासपीठ आहे. आयटी, आरोग्य, फायनान्स, क्रीडा, कलाकार, कृषी, पर्यावरण, आर्किटेक्ट, LGBTQIA, गीग वर्कर यांचा यात समावेश असून त्यांच्या हक्कासाठी आवाज बनून, धोरण ठरवण्यासाठी आम्ही काम करत आहोत.”असे पल्लवी नायक म्हणाल्या.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे, डॉ. निमिष साने व मारिओ पेन्हा यांनीही प्रोफेशनल काँग्रेसबद्दल माहिती दिली. विविध क्षेत्रातील अनेक लोक राजकीय पक्षाबरोबर काम करु इच्छितात पण त्यांच्यासाठी एका व्यासपीठाची गरज असते आणि काँग्रेसने ती उपलब्ध करून दिली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या महत्त्वाच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.”असेही त्यांनी सांगितले.





















