*आमच्या कामांचा ‘धूमधडाका’ पाहून विरोधकांचा ‘थरथराट’ होतोय…*
*अंबरनाथ मधील नवीन नाट्यगृह स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी…*
*अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचे पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते लोकार्पण*
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ अभिनेत्यांच्या मांदियाळीत रंगला सोहळा..*
ठाणे,
” ठाणे, कल्याण-डोंबिवली येथे नाटक पाहण्यासाठी जाण्याची गरज आता संपली आहे. कारण अंबरनाथमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर’ उभारण्यात आले असून, यामुळे शहराला नवे सांस्कृतिक वैभव लाभले आहे. या नाट्यमंदिराचे लोकार्पण पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ज्येष्ठ चित्रपट निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते नाटककार अशोक समेळ, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, अभिनेता मकरंद अनासपुरे, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री विशाखा सुभेदार, बाळ कोल्हटकर यांच्या कन्या भाषा अमरेंद्र फाटक यांसह अनेक कलावंतांची मांदियाळी उपस्थित होती. डॉक्टर बालाजी किणीकर, अरविंद वालेकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेश मोरे, वामन म्हात्रे, गोपाळ लांडगे, कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, अभिनेता निर्माता मंगेश देसाई यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी प्रेक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, की “भाऊबंदकी नावाचे नाटक एकेकाळी फार गाजले होते, मात्र आता ‘मनोमिलन’ नाटकाचे जोरदार प्रमोशन सुरू झाले आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तसेच आम्ही कामाने ‘ पछाडलेली’ लोकं असल्याने आमच्या कामांचा ‘धूमधडाका’ पाहून विरोधकांचा ‘थरथराट’ होत असल्याची, मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाने अंबरनाथ मध्ये उभ्या राहिलेल्या या नाट्यगृहाच्या निर्मितीमुळे ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या प्रेक्षकांना न जाता आता येथेच दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेता येईल. ज्यांनी या नाट्यगृहाची संकल्पना मांडली, बांधकाम केले. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हे नाट्यगृह साकार करून अंबरनाथच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णपान जोडले गेले असल्याचे सांगितले.”
ते पुढे म्हणाले, “अंबरनाथचे हे नाट्यगृह हे केवळ एक इमारत नाही तर सांस्कृतिकतेचे प्रतीक आहे. प्राचीन शिवमंदिरानंतर आता हे नाट्यगृह हीच या शहराची नवी ओळख ठरेल असा विश्वास व्यक्त केला.”
कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. ‘लाडकी बहीण योजना’, ‘लेक लाडकी लखपती योजना’, ‘शेतकरी सन्मान योजना’ अशा लोकाभिमुख योजना राबवल्याचे सांगितले. “शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम आम्ही केले असून, त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्द मी दिला होता आणि तो पाळला आहे,” असे ते म्हणाले.
कलाकारांविषयी बोलताना शिंदे म्हणाले, “अशोक सराफ हे नाट्यकलेचे चालते-बोलते विद्यापीठ आहेत. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याचा योग मला आला. आज इतके दिग्गज कलाकार येथे एकत्र आल्याने जणू काही अंबरनाथमध्ये तारांगणच अवतरले आहे.”
विरोधकांवर टीका करताना त्यांनी मिश्किल भाषेत म्हटले, “अशोक सराफ यांचे एक खूप गाजलेले नाटक आहे ‘सारखं छातीत दुखतंय’, शिवसेनेचे यश पाहून देखील काही लोकांच्या पोटात दुखतं, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला. मी कोणावर टीका करत नाही पण मी आरोपाला नेहमी कामातून उत्तर दिले असल्याची आठवण करून दिली.
या नाट्यगृहातील रंगमंचाला ‘बाळ कोल्हटकर रंगमंच’ असे नामकरण करण्यात आले. तसेच प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळाही उभारण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमात शिंदे यांनी आवाहन केले, “हे नाट्यगृह म्हणजे आपल्या गावाचा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याची निगा आणि स्वच्छता राखा. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.”
“पुर्वी अंबरनाथचे रस्ते खड्ड्यांनी भरलेले होते, आज सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. शूटिंग रेंजपासून अनेक प्रकल्प साकार झाले आहेत. आता हे नाट्यगृह प्रेक्षकांची कलात्मक भूक भागवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेवटी त्यांनी हलक्या फुलक्या शब्दात म्हटले, “महाराष्ट्रातील अनेक नाट्यगृह बटाटावड्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अंबरनाथचाही बटाटावडा तितकाच प्रसिद्ध होऊ द्या!” अशी अपेक्षा व्यक्त केली.




















