Home Uncategorized *महालक्ष्मी मंदिर परिसर सुशोभीकरण आणि विकास कामांचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण...

*महालक्ष्मी मंदिर परिसर सुशोभीकरण आणि विकास कामांचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी प्रत्यक्ष भेटीतून घेतला आढावा*

80
0

मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व विकासकार्य बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे. याअनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी महालक्ष्मी मंदिर येथे दि १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन, परिसराची पाहणी केली तसेच या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला.

डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, महालक्ष्मी मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे सल्लागार वास्तुतज्ज्ञ शशांक मेहंदळे या पाहणीवेळी उपस्थित होते. तसेच, महालक्ष्मी मंदिर न्यासाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एन. गुपचूप, विश्वस्त एस. व्ही. डोंगरे, एस. एस. वैद्य, श्री. एस. के. दांडेकर, व्यवस्थापक एन. व्ही. कांबळी हे देखील बैठकीवेळी उपस्थित होते.

मुंबईत विविध प्राचीन धार्मिक स्थळे आहेत. त्यामध्ये भुलाभाई देसाई मार्गावर स्थित महालक्ष्मी मंदिराचा प्रामुख्याने समावेश होतो. मंदिर आणि परिसराला भेट देणाऱ्या भाविकांकरिता अधिक चांगल्या नागरी सेवा-सुविधा पुरवता याव्यात, यासाठी मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि विकास कामे बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहेत. या कामांमध्ये खालील ठळक बाबींचा समावेश आहे:

महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील दुकाने / गाळे यांची पुनर्रचना करून सुसूत्रीकरण करणे व रस्त्यांची सुधारणा करणे; मार्गावरील भिंतींवर कलात्मक रंगरंगोटी करणे; पुरातन वारसा (हेरिटेज) शैलीतील विद्युत खांब आणि स्ट्रीट फर्निचर उभारणे; मार्ग दर्शक फलक (वे-फाइंडिंग साइनबोर्ड्स) स्थापित करणे; मुख्य मार्गावर आकर्षक कमानी उभारणे; गर्दीच्या नियोजनासाठी आवश्यक उपाययोजना करणे; परिसरात आकर्षक विद्युत रोशनाई करणे; आवश्यकतेनुसार भित्तीशिल्पे (Murals) साकारणे यासह इतर बाबींचा त्यात समावेश आहे.

संपूर्ण मंदिर परिसरात प्रत्यक्ष फिरून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी यांनी पाहणी केली आणि या विकास कामांचा तसेच सुशोभीकरण कामांचा आढावा घेतला. सर्व कामांना गती देण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले.

दरम्यान, महालक्ष्मी मंदिर न्यासाकडून प्रस्तावित भक्तनिवास जागेची देखील गगराणी यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे मंदिराच्या मागील बाजूस मुंबई किनारी रस्त्याच्या दिशेने निर्गमन मार्ग व तेथील संभाव्य कामे, उपाययोजना यांची देखील त्यांनी माहिती जाणून घेतली. महालक्ष्मी मंदिरातील भाविकांचा ओघ पाहता सुशोभीकरण त्याचप्रमाणे परिसरातील इतर कामे पूर्ण झाल्यानंतर भाविकांना जास्तीत जास्त नागरी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, तसेच दर्शन व इतर सर्व व्यवस्था सुलभ झाली पाहिजे, या दृष्टीने सर्व कामांमध्ये ताळमेळ साधण्याचे निर्देशही गगराणी यांनी सर्व संबंधितांना दिले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here