*हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम यांच्या सहकार्याने व मुंबई अग्निशमन दलाच्या पुढाकाराने मुंबईत होणार ३५० जनजागृती शिबिरे*
*गॅस वितरणासाठी कार्यरत कामगार व कर्मचाऱ्यांसाठी देखील आयोजित होणार विशेष शिबिरे*
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर संबंधित काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एक विशेष जनजागृती अभियान घेण्याचे निर्देश दिले होते.
या निर्देशांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि ‘भारत पेट्रोलियम’ व ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ या गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने मंगळवार दि. ७ ऑक्टोबर ते शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधी दरम्यान एक ‘विशेष जनजागृती अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३५० पेक्षा अधिक ठिकाणी जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.”अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना आंबुलगेकर बोलत होते.
या बैठकीला उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल परब, अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाचे ई. बी. माटले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर भारत पेट्रोलियमचे क्षेत्रिय व्यवस्थापक श्री. संदीप पवार, हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वरिष्ठ व्यवस्थापिका श्रीमती गीतिका पालीवाल यांच्यासह संबंधित अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.
आज आयोजित बैठकीदरम्यान स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर वापराबाबत व सुरक्षिततेबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती अभियानाबाबत विविध स्तरीय नियोजन देखील करण्यात आले. यानुसार जनजागृती अभियानांतर्गत मुंबईतील ३५० पेक्षा अधिक ठिकाणी गॅस सिलेंडर वापराबाबत प्रात्यक्षिकांसह प्रबोधन व जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अनधिकृत गॅस सिलेंडरचा वापर याबाबत संयुक्त पद्धतीने अधिक कठोर कारवाई करण्याचे सुतोवाच देखील आजच्या बैठकीत करण्यात आले.
गॅस सिलेंडर वितरण साखळीत असणारे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, वितरकांच्या स्तरावर कार्यरत असणारी कर्मचारी आणि ग्राहकांच्या घरी सिलेंडर नेऊन देणारे कामगार या सर्वांसाठी देखील मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करण्याची सूचना प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी गॅस वितरण कंपन्यांना दिली. या सूचनेनुसार प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येतील, असे दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींद्वारे यावेळी आश्वस्त करण्यात आले.
याच बैठकीदरम्यान मुंबईतील गॅस सिलेंडर वितरणाबाबत आकडेवारी देताना भारत पेट्रोलियम या कंपनीद्वारे सांगण्यात आले की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात त्यांच्या कंपनीचे सुमारे १४ लाख ५० हजार घरगुती गॅस सिलेंडरचे ग्राहक असून याव्यतिरिक्त ३८ हजार व्यावसायिक ग्राहक आहेत. तर हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीच्या गॅस सिलेंडरच्या घरगुती ग्राहकांची संख्या ही सुमारे १० लाख ५० हजार इतकी आहे. तर याच कंपनीचे ४० हजार ग्राहक हे व्यावसायिक सिलेंडर साठीचे ग्राहक आहेत. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दोन्ही कंपन्यांचे मिळून सुमारे २५ लाख घरगुती गॅस सिलेंडर ग्राहक आहेत. तर ७८ हजार ग्राहक हे व्यावसायिक सिलेंडरचे ग्राहक आहेत. विशेष म्हणजे घरगुती ग्राहकांपैकी बहुसंख्य ग्राहकांकडे दोन सिलेंडर आहेत. तर व्यवसायिक सिलेंडर ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहकांकडे एकापेक्षा अधिक सिलेंडर आहेत. तसेच अनेक व्यवसायिक ग्राहकांकडे ‘सिलेंडर बँक’ देखील आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांची संख्या जरी सुमारे २५ लाख ७८ हजार असली, तरी एकूण सिलेंडरची संख्या ही त्यापेक्षा निश्चितच जास्त आहे.
“या सर्व ग्राहकांपर्यंत अर्थात सुमारे २५ लाख ७८ ग्राहकांपर्यंत गॅस सिलेंडरचा सुरक्षित वापर करण्याबाबत सविस्तर माहिती ही प्रात्यक्षिकांसह पोहोचावी व ती नियमितपणे देण्यात यावी.” अशी सूचना प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी आजच्या बैठकीदरम्यान केली. त्याचबरोबर अभियान कालावधीनंतर देखील ग्राहकांच्या मागणीनुसार सोसायटी स्तरावर, वसाहत स्तरावर जनजागृती शिबिरे नियमितपणे आयोजित केली जावीत.”असेही त्यांनी दोन्ही कंपन्यांना सुचविले. दि. ०७ ते १७ ऑक्टोबर २०२५ यादरम्यान मुंबईत विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या जनजागृती शिबिरांना मुंबईकरांनी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित रहावे.” असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने केले आहे. आज आयोजित संयुक्त बैठकीच्या अखेरीस भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या दोन्ही गॅस वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जनजागृती अभियान आयोजित करण्यात पुढाकार घेतल्या बाबत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी आणि मुंबई अग्निशमन दलाचे विशेष आभार मानले.
===
















