हातखंबा, रत्नागिरी येथे नमन लोककला रत्नागिरी जिल्हा, मातृसंस्था आयोजित “नमन – कोकणची समृद्ध लोक संस्कृती” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं की, कोकणची संस्कृती, परंपरा आणि लोककला यांचा अमूल्य ठेवा या पुस्तकात जतन करण्यात आला आहे. या समृद्ध वारशाचं दस्तऐवजीकरण करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य संतोष गोनबरे यांनी केलं आहे, त्यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
आपली लोकसंस्कृती म्हणजे फक्त परंपरा नाही, तर ती आपल्या इतिहासाची आणि ओळखीची मूळ आहे. नमन ही फक्त एक लोककला नाही, तर हिंदू संस्कृती जपणारी आणि समाजाला एकत्र आणणारी परंपरा आहे. रामायण-महाभारतासारख्या ग्रंथांमधून प्रेरणा घेऊन आपल्या पूर्वजांनी ही कला टिकवली, ती पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे.
आजच्या तरुण पिढीने शिक्षणात प्रगती करत असतानाच आपल्या मूळाशी जोडून राहणं गरजेचं आहे. लोककलेचं संवर्धन व्हावं यासाठी सर्व मंडळांनी नोंदणी करून शासनाच्या योजना आणि लाभांचा लाभ घ्यावा.
ही कला आणि परंपरा टिकवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे. आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.




















