महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण
मुंबई,दि.- “महाराष्ट्राची परंपरा असेलल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून सामाजिक सौहार्द, कला संस्कृतीचे प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाची व्यापकता येत्या काळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी येथे केले.
प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या राज्य व जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार होते, बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कौशल्य विकास, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार महेश सावंत, सांस्कृतिक विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु.ल.देशपांडे अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होत्या.
मंत्री ॲड.शेलार यावेळी म्हणाले की, “शासनाने राज्यातील ऐतिहासिक बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोद्वारा जागतिक वारसा मानांकन प्राप्त केले आहे. महाराष्ट्रात गणेशोत्वाला शंभर वर्षांची प्रदिर्घ परंपरा लाभलेली आहे. आज देशविदेशात विविध ठिकाणी हा उत्सव उल्हासात साजरा केल्या जातो. सामजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावणारा आणि लोककला, लोकसंस्कृती, लोकसंवाद यांना बळ देणारा गणेशोत्सव हा सर्व धर्मीय, सर्व स्पर्शीय, व सौहार्द यांची जोपासणा करणारा महत्वाचा उत्सव आहे. त्याची व्यापकता ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवण्याचा शासनाचा मानस असून यादृष्टीने देशातील विविध राज्यात तसेच विदेशांमध्ये ही विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या उत्सवात सक्रियपणे सहभागी होणा-या गणेशमंडळांच्या कामांची दखल घेत नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रम राबवणा-या गणेशोत्सव मंडळाच्या कामांना प्रोत्साहन देण्याच्या व्यापक उद्देशाने शासनाने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरापर्यंत असलेल्या या स्पर्धां तालुकास्तरापर्यंत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने गणेशमंडळानी सहभाग घेत उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल तसेच सर्व विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी अभिनंदन केले.
*चौकट* – “राज्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून मुख्यमंत्री यांच्या निर्दैशानुसार बाधितांना आवश्यक सहाय्य शासनस्तरावरुन करण्यात येत आहे. या पूरस्थितीत गणेशमंडळांनीही सहकार्य करावे.” असे आवाहन , सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यावेळी केले.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणले की, “गणेशोत्सवाला शासनाने राज्य महोत्सव म्हणून दर्जा दिला असून हा उत्सव अधिक व्यापक होण्यास त्यामुळे सहाय्य होईल. प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील बारा गडकिल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या वारसा यादीत झाला आहे ही निश्चितच अभिनंदनीय बाब असल्याचे ही, मंत्री लोढा यावेळी म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मंडळांचा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक मीनल जोगळेकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत राज्यात पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील तिरंगा गणेशोत्सव मंडळाने प्राप्त केले आहे. तर लातूर येथील वसुंधरा वृक्षारोपी गणेशोत्सव मंडळाने द्वितीय, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील सुवर्णयोग तरुण मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. 0000000000


















