*चांगभलं* दै.द ग्लोबल टाइम्स (दि.२२सप्टेंबर२०२५)
शीतल हरीष करदेकर -कार्यकारी संपादक
“चिनाय शेठ! जिनके अपने घर शिशेंके हो,वो दुसरों पर पत्थर फेंका नही करते!” हा ‘वक्त’ चित्रपटातील अभिनयसम्राट राजकुमारचा साध्या शब्दातील प्रभावी डायलॉग, जो खूप गाजला…
आशयघन असा ‘वक्त ‘ चित्रपट काळाचा महिमा सांगतो…
आज तो प्रकर्षाने आठवला…कारणं अनेक आहेत. महाराष्ट्रात..आपल्या भारत देशात,देशाच्या आसपासच्या देशांत जे घडतंय, ते विषय चिंतनीय आहेत.(पण आपण अडकलोय धर्मजातीवाद, पक्ष वादाच्या लढाईत!) मुळात बेसिक पट्टी हरवलेली बेसुर भातापेटी असते ना तशी आपली जगण्याची पट्टी विसरुन सध्याच्या तांत्रिक गाडीत कसेबसे शोभून बसण्यात धन्यता मानणारे!
आज भारताचा असा कुठला नेता आहे, जो अमेरिकेशी सरळ थेट संवाद साधू शकतो? कुणीतरी असं म्हटलं की,” नेपाळसारखी वेळ भारतात येऊ शकते! लोक रस्त्यावर उतरतील..वगैरे! ”
भारतात अनेक विषयांवर रस्त्यावरची आंदोलनं सुरुच असतात. पण “हक्काच्या आंदोलनांना जर अर्बन नक्षलवाद आणि …कसले कसले नक्षलवाद म्हणून गोर्या इंगजांप्रमाणे कायद्याच्या रेघोट्या मारल्या गेल्या तर लोकशाही धोक्यात आहे, हे बोलण्याचा अधिकार आपण गमावलेला नाही हे आपलं सुदैव!”
*अंतर्गत -बाह्य सुरक्षा व सौहार्द महत्वाचे!*
भारताच्या आसपासच्या देशांची सरकारे अचानक २ / ३ दिवसांच्या अंदोलनानंतर कोसळताहेत . श्रीलंकेचे सरकार कोसळले नंतर सीरियाचे कोसळले, मग बांगलादेशचे सरकार ,त्यानंतर नेपाळचे सरकार कोसळले .
त्या आधी जपानच्या पंतप्रधानांनी राजीनाम्याची घोषणा केली आणि तो मंजुरही झाला .
पुर्वी ज्या घटना घडण्यासाठी ३/४ वर्ष लागायची त्या आता अतिशय कमी कालावधीत घडत आहेत ..हे सगळं दिसतं तसं सामान्य नाही!
अमेरिका वेगळ्या पध्दतीने आणि चीन त्यांच्या पध्दतीने विविध शक्तीचे खेळ खेळतात! आपल्या जमीनीवर जराही ओरखडा उमटू न देता काम करत रहातात…
आपल्याला आठवत असेल, देशात काँग्रेस सरकार असताना इंदिरा गांधीच्या व नंतरच्या काळात ही काही घडलं की, ‘इसमे बाहरी शक्ती का हात है ‘, असं सहज म्हटलं जायचं!
पण तितक्याच ताकदीने स्वतंत्र बांग्लादेशासाठी आयर्न लेडी इंदिरा गांधी (दुर्गा) उभी राहिली. त्याचं कौतुक , अटलबिहारी वाजपेयी यांनी केलं ! आता राजकारणाचं सत्ताकारण झालंय..सत्तेसाठी सगळी धडपड! कुणाला जनतेच्या जगण्याचं पडलेलं नाही..’पैसा फेको तमाशा सब देखो..’ असे रोजचे पैसेवाले खेळ खेळण्यात सर्व मग्न आहेत.बासरी वाजवणारा माणूस कसा गावातून उंदिर, लोकांना आपल्यामागे नेतो तसं गोबेल ,₹बेल तंत्र सुरु आहे! मोठा परिणाम समाजाच्या आरशावर मोठा प्रभाव आहे या सगळ्याचा!…
*आज आपण विश्वगुरु , जागतिक महासत्ता* *बनण्याचे स्वप्न पहातोय, तसं काम सुरु आहे…पण* आपण आपल्या बाह्य सीमा सुरक्षित करताना अंतर्गत शक्तीत मजबुत आहोत का? याचाच विचार करत नाही.*
*आमचे रक्षामंत्री व गृहमंत्री यावर विरोधी पक्षांना एकत्र घेऊन लोकांशी संवाद साधणार का?*
*पक्षापलीकडे जाऊन प्रत्येक राज्याचा कानोसा घेणार का?*
*सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे तो ज्येष्ठ नागरिक व तरुणाई शी संपर्क करण्याचा. हे कुणी करेल असं वाटत नाही.*
*सखोल चिंतन मंथन, सहकार्य भावना आवश्यक*
*शांघाय सहकार्य संगठन (एससीओ) चीनमध्ये झाल्यानंतर २ सरकारे कोसळली.*
इथली संपुर्ण परिस्थिती लक्षात घेतली तर लक्षात येतं की, एकाच प्रकारची व्यूहरचना होत आहे.
अचानक दंगली घडतात पोलीस आणि लष्कर काही करू शकत नाही . तिथले पंतप्रधान ,मंत्री यांची घरे जाळली जातात, पार्लमेंट जाळली जाते ,न्यायालयांवर हल्ला, सरकारी कार्यालये जाळली जातात
यानंतर नवीन येणारी सरकारं ही अमेरिकेच्या हातातली बाहुले असतात. पण हे दिसतंय तितकं साधं सरळ नाही.
जपानी पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले , चर्चा केली आणि त्यानंतर तीन दिवसात त्यांचा राजीनामा झाला .
नेपाळमधे चीनच्या तालावर नाचणारे पंतप्रधान होते .पण ज्या प्रकारे सगळं काही घडलं ते वाईटच होतं .तिथल्या एका माजी पंतप्रधानला (वय ८० ) बेदम मारहाण केली गेली तर दुसऱ्या पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळण्यात आले . याचा प्रखरपणे निषेध करणे आवश्यक आहे. ही क्रूरतेची परिसीमा आहे. ..याचा त्रिवार निषेध!
या संपुर्ण नरसंहारात कितीजण जीवानिशी गेले असतील हे सांगता येत नाही . इथे माणुसकीच फासावर चढली आहे…
अनिर्बंध सत्ता आणि वर्चस्ववाद माणसाला राक्षस बनवतो.. पाशवी बनवतो..
दुसरीकडे अमेरिकेत आर्थिक दृष्ट्या सगळं आलबेल आहे असंही नाही.
ट्रम्प बाहेरच्या देशातील लोकांना रोखण्यासाठी जे काही निर्बंध घालत आहेत ते त्यांच्या अंगलट
येतील तेव्हा येतील,पण सध्या त्यांचं व्यापारी डोकं जे खेळ करत आहेत ते चांगले नाहीत.
म्हणूनच कुणीतरी या ‘चिनाय शेठ’ ला तो राजकुमारचा संवाद वेगळ्या भाषेत सांगायची गरज आहे.
*मुलं नि सक्षम नागरिक*
समाजमाध्यमांवर खूप लिखाण होतं,पण त्याचा विचार गंभीरपणे कुणी फारसं करत नाहीत.
पण एका लेखाचं शीर्षक जास्त प्रकर्षाने ओरखडे मारुन गेलं, ‘ माहिती आहे का, तुमच्या घरात जिवंत बाँब आहे…’ तुमची मुलं मोबाईल च्या आहारी गेलीत, त्यात येणारे संदेश,खेळ आणखी काहीबाही यांनी ती भरकटतात!
नेपाळमधे लोकक्षोभ झाला, तो नक्की काय होता ते लवकरच कळेल पण मुलांआधी पालकांनीही खूप सोशलवहाणं, हाॅटेलिंग ,ऑनलाइन खरेदी, सगळ्या नाटकी सोशोवर नियंत्रण आणायला हवं.घराघरातून संवाद वाढायला हवा.
काय चुकतंय काय बरोबर हे बोलायला हवं…पण भेटून.
आपलं कुटुंब आपलं माणूस जपायला हवं ,तरच सोशल आक्रमणाची भीती रहाणार नाही.
*लाकडांची एकत्र मोळी तोडता येत नाही, तसंच संघटित रहाणं आवश्यक!*
२०२१ला मॅनमारमधे सरकार बदलले. अफगाणिस्तानात तालिबान आले.२०२२ मधे श्रीलंकेत जनता रस्त्यावर आली.याचवर्षी पाकिस्तानात इम्रानखानना खुर्चीवरुन खाली खेचले.२०२३ ला मणिपूर जळायला लागलं.२०२४ येतायेता बांग्लादेशमधे हाच प्रकार सुरु झाला.
सत्तापरिवर्तनासाठी भारतात ही परिस्थिती येईल असं काही जणं थेट व आडून बोलतात.
पक्षीय वैचारिक मतभेद कितीही असोत, भारताने स्वातंत्र्य खूप त्यागाने, बलिदानाने मिळवले आहे. त्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे!
आणि म्हणूनच सध्याचं टुकारबेकार ‘राजकीय महाभारत’ बाजूला ठेवून “भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आंतरिक सुरक्षा व सामंजस्य जपणं, वाढवणं’ हे *राज्यकर्ते व जनतेचं* प्रथम कर्तव्य आहे.”
या राजकीय ‘चिनाय शेठना ‘ जनतेचं एकच सांगणं आहे…’शेठ ..दुसर्यांवर दगड फेक करताना आपली घरं सुरक्षित रहात नाहीत..म्हणून हाती दगड घेऊही नका..कारण तुमची सगळ्यांची घर काचेचीच आहेत.
आपली एकी असेल तर चीन अमेरिकन तंत्र आपल्याकडे चालणार नाही…
अमेरिका..हात लावेन तिथं सोनं असं वाटणारा देश असला..तरी अन्न पाणी सोन्याचं खाता पिता येत नाही…हे वास्तव आहे… “कशाला हवीय अमेरिका..आपला भारतच आहे भला…या चिमण्यांनो परत फिरा .” अशी दमदार प्रेमळ साद महागुरुनी द्यायला हवी. हे असे सल्ले देणारे विद्वान आपल्या सत्तेच्या आसपास नाहीत? असतील पण ऐकण्याची मानसिकता हवी ती वर्चस्ववादी नि व्यापारी वृत्तीत एकदम तळाला असते..हे सध्याचं वास्तव!
*आज आदिशक्ती जगदंबेची घटस्थापना होतेय.*
तिच्याकडे एकच मांगणे की, ‘आई! बल,बुध्दी आरोग्य सुबत्ता दे! आमचा महाराष्ट्र, भारत देश जगात तेजाने झळकत राहो ” दुर्गे , अधर्माचं निर्दालन कर!
*****


















