यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने सन २०२१ सालापासून शिक्षण, कृषी आणि साहित्य या क्षेत्रात नवीन काहीतरी करू पाहणाऱ्या युवा पिढीला फेलोशिप दिली जाते. यासोबतच यावर्षीपासून (२०२५-२६) बालशिक्षणामध्ये काम करणार्या व्यक्तींसाठीदेखील शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) देण्यात येणार आहे.
२०२० साली जाहीर झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने (NEP २०२०) बालशिक्षणाला प्रथमच औपचारिक शिक्षणव्यवस्थेचा भाग म्हणून मान्यता दिली आहे. वय वर्षे ३ ते ८ या काळाला शिक्षणातील Foundational Stage म्हणण्यात आले आहे व त्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात ताराबाई मोडक, अनुताई वाघ, सिंधूताई अंबिके यांसारख्या तज्ज्ञांनी बालशिक्षणाचं काम बरंच आधीपासून उभं केलेलं आहे. आत्ता अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या सेवीका, मदतनीस, त्यांच्या सुपरवायझर, CDPO व त्यांना सहाय्य करणारे सहकारी हे काम पुढे घेऊन जात आहेत.
बालशिक्षणाच्या या कामाला संशोधनाची जोड मिळायला हवी. हे संशोधन महाराष्ट्रातील बालशिक्षणाच्या वाहकांनी करायला हवं व महाराष्ट्रातील बालशिक्षण याद्वारे आणखी सुदृढ व्हायला हवं. आणि म्हणूनच शरद पवार इन्स्पायर फेलोशीप या वर्षी प्रथमच शालापूर्व स्तरावर बालशिक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
यावर्षी प्रथमच सुरू केलेल्या बालशिक्षणाच्या अर्जांमधून निवड समितीद्वारे १० जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका, CDPO, बालशाळांमध्ये कार्यरत शिक्षक, तसेच बालशिक्षणात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांतील कार्यकर्ते यांना यावर्षी बालशिक्षणामधील फेलोशिप दिली आहे जेणेकरून त्यांना बालशिक्षण क्षेत्रात कृती संशोधनाच्या माध्यमातून भरीव कामगिरी करता येईल.
निवड झालेल्या फेलोंची नावे खालीलप्रमाणे आहेत.
१) नीलम दीपक जगदाळे – सातारा
२) कल्पना भास्कर गारे – पालघर
३) शीतल शंकर पाठक- अहिल्यानगर
४) प्रज्ञा दत्तात्रय शेंपुडे – रायगड
५) अस्मिता बिर्जे – रायगड
६) उन्नत सांगळे – ठाणे
७) भावना भानुदास पाटील – नाशिक
८) मुन प्रल्हाद रायपुरे – नागपूर
९) बुद्धपाल डुमने – नांदेड
१०) आकाश रामचंद्र गोरे – पुणे



















