*मुंबई उपनगरे जिल्हा सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश*
“बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबई महानगराचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. विकास कामांबरोबरच मुंबईकर नागरिकांना उच्च दर्जाच्या मूलभूत सेवासुविधा पुरविण्याची आग्रही भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. मुंबईकर नागरिकांच्या समस्या सोडविण्याठी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे,” असे निर्देश राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयात सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आज (दिनांक २२ ऑगस्ट २०२५) आयोजन करण्यात आले होते. स्थानिक आमदार अबू आझमी, स्थानिक आमदार सना मलिक, उप आयुक्त (परिमंडळ ५) देवीदास क्षीरसागर, एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त उज्वल इंगोले यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सहपालकमंत्री ना.लोढा यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्यासमवेत संवाद साधला. सुमारे दोनशेपेक्षा जास्त नागरिकांनी समस्या मांडल्या. प्रामुख्याने रस्ते दुरूस्ती, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, सुशोभीकरण, घनकचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे, सीसीटीव्ही बसविणे, जलवाहिनी बदलणे, सार्वजनिक प्रसाधनगृहांची उभारणी, इमारतींचा पुनर्विकास यांसारख्या विविध समस्यांचा यामध्ये समावेश होता. या समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांशी
संपर्क साधून त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश लोढा यांनी दिले.
लोढा पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईकर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जनता दरबारात आलेल्या नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण करावे. समस्या निराकरणात असलेल्या अडचणी जाणून घेऊन त्या लवकर सोडवाव्यात”, असे निर्देशदेखील लोढा यांनी दिले.
***



















