शिवाजी विद्यापीठात ‘नशामुक्ती’ विषयावर व्याख्यान
कोल्हापूर, २० ऑगस्ट : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (IIC) व राजारामपुरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “नशामुक्ती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. समाजात वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येकडे लक्ष वेधत या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सजग होण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे योगेशकुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर होते. आपल्या भाषणात त्यांनी व्यसन व गुन्हेगारी यांचा थेट संबंध स्पष्ट केला. ते म्हणाले, नशा ही केवळ व्यक्तीचे आरोग्यच नव्हे तर कुटुंब व समाजाच्या प्रगतीलाही अडथळा आणते. गुन्हेगारी व अपघात ही थेटपणे व्यसनाशी जोडलेली आढळतात. बी फॉर बर्थ आणि डी फॉर डेथ यामध्ये सी फॉर चॉईस असतो व हाच चॉईस आपण सद्सद्विवेक बुद्धीने निवडला पाहिजे. संवाद व समुपदेशन नशामुक्तीसाठी गरजेची असून युवक हीच देशाची खरी ताकद आहे. नशामुक्त सुदृढ तरुणाईसाठी ठाम निश्चय करणे आवश्यक आहे, असे आवाहनही केले. अमली पदार्थ विरोधी कायदा तसेच मिशन झिरो ड्रगबद्दलही त्यांनी माहिती दिली.
न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांनी तरुणांमधील नशा व नशामुक्तीमधील आव्हाने विषद केली. ते म्हणाले, क्षणिक सुखाकरिता व्यसनाधीन न होता, कष्ट करून चिरकाल टिकणारा आनंद मिळवता आला पाहिजे. मद्यपान, धूम्रपान आणि अंमली पदार्थ यामुळे यकृत, हृदय आणि स्नायूंवर गंभीर परिणाम होतातच, पण त्याशिवाय व्यक्तीच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्थैर्यावर देखील परिणाम होतो. व्यसनामुळे स्मरणशक्ती कमी होते, मेंदूवर परिणाम होतो, नैराश्य व आत्महत्येचे प्रमाण वाढते. अमली पदार्थासोबतच समाजामधील मोबाईल फोन्स, सोशल मीडिया यांचे वाढते व्यसन चिंताजनक असून त्यामुळे कुटुंबसंस्थेला धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी फियर ऑफ मिसिंग आऊट या गैरसमजामुळे अनेकदा तरुण व्यसनांच्या आहारी जात असल्याचे सांगितले.
शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी तरुणाईला नशामुक्तीकरीता स्वयंपरीक्षण व आत्मनियंत्रण अतिशय महत्वाचे असून सुदृढ नशामुक्त तरुण हेच राष्ट्राचे भवितव्य आहेत, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, उत्तम नागरिक होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करणे अतिशय महत्वाचे असून आरोग्यास हानिकारक व्यसनापासून दूर राहून व्यक्तिमत्व घडविणाऱ्या सवयींची निवड करणे गरजेचे आहे. व्यक्तिमत्व घडविताना उत्कृष्ट पुस्तके वाचली पाहिजेत. जाणीवपूर्वक चांगले छंद जोपासले पाहिजेत. शिवाजी विद्यापीठ सामाजिक भान निर्माण करणाऱ्या उपक्रमांना सदैव प्रोत्साहन देते, असे ते म्हणाले.
हर्षवर्धन पंडित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. विभागाचे प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहर डीवायएसपी प्रिया पाटील, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, विद्यापीठातील प्राध्यापक, समन्वयक, विद्यार्थी, शिक्षक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
फोटोओळ- पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांचे स्वागत करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे. (सोबत डावीकडून) डॉ. धीरजकुमार बच्चू, सिद्धार्थ शिंदे, डॉ. संतोष प्रभू, डॉ. अजित कोळेकर व हर्षवर्धन पंडित.



















