राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) 2024 अंतर्गत रत्नागिरी जिल्हयाने दमदार कामगिरी केली आहे. रत्नागिरीला ‘अ-श्रेणीतील’ सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. 14 जुलै, 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत मंडपंमध्ये राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) 2024 पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
जागतिक स्तरावर ओळख असलेला आंब्याचा राजा ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ अंतर्गत हापूस आंबा रत्नागिरी जिल्ह्यातून अव्वल ठरला आहे. कृषी क्षेत्रातील ‘अ-श्रेणी’ मधून सुवर्णपदक मिळवत प्रथम स्थान मिळविले आहे. हापूस आंब्याची गोड चव, उत्कृष्ट गुणवत्ता, जागतिक बाजारपेठेतील मागणी यामुळे रत्नागिरी जिल्हयाला हे यश मिळाले आहे. रत्नागिरी जिल्हयाने जीआय प्रमाणपत्र प्रक्रिया आणि नियामक चौकटी समजून घेण्यासाठी उत्पादकांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्वसमावेशक निर्यात मार्गदर्शिका विकसित करण्यामध्ये पुढाकार घेतला. यासोबतच, तक्रार निवारणासाठी कार्यक्षम यंत्रणा विकसित करण्यात आल्या असून वेळेत समस्यांचे निराकरण होत आहे. रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हाधिकारी एम.देवद्र सिंह, कोकण विभागाचे उद्योग सह संचालक विजू सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर यांनी हा पुरस्कार स्विकारला.
एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उपक्रम भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक जिल्हयाच्या वैशिष्टयपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन देवून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, जागतिक बाजारपेठेत त्याचा ठसा उमटवणे आणि पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत या उद्दिष्टाची पुर्तता करणे हा आहे.
या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ पुरस्काराकरिता संपूर्ण भारतातून 31 राज्य, केंद्र शासित प्रदेश, 587 जिल्हे आणि 23 भारतीय मिशनच्या विविध श्रेणींमधून एकूण 641 अर्ज प्राप्त झाले. उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागांमार्फत (DPIIT) 60 जिल्हयांचे नामांकन झाले. यामध्ये महाराष्ट्राच्या 14 जिल्हयांचा समावेश होता. राज्याच्या निवड झालेल्या 14 जिल्हयांमध्ये कोकण विभागातील ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यांचा समावेश होता. महाराष्ट्रातून निवड झालेल्या 14 जिल्हयांपैकी 5 जिल्हयांना (रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक, अकोला) राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ पुरस्कार 2024 भारत सरकारकडून प्राप्त झाला असून महाराष्ट्र राज्यानेही सुवर्ण पदक पटकावत राज्याच्या उत्पादनाच्या नाविन्यपूर्णतेने, उच्च दर्जाने आणि वैशिष्टयपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
National ODOP Awards-2024 चा एक भाग म्हणून DPIIT आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्या पथकाने 24 डिसेंबर 2024 ते 27 डिसेंबर 2024 दरम्यान या विभागात ODOP युनिट्सची प्रत्यक्ष भेटी या पडताळणी प्रक्रियेत शासकीय योजनांच्या दाव्यांची पडताळणी, कागदपत्रांची छाननी, उत्पादन प्रक्रियेची तपासणी, स्थानिक भागधारकांशी संवाद इत्यादींचा समावेश होता, ज्यामुळे ODOP च्या उद्दिष्टांशी जुळणाऱ्या उपक्रमांची खातरजमा करण्यात आली. महाराष्ट्रातील MAITRI पोर्टलवर राज्य आणि जिल्हयातील ODOP नोडल अधिकाऱ्यांचा संपर्क तपशील उपलब्ध करुन सुलभ समन्वय आणि सुविधा सुनिश्चित करण्यात आली आहे.
ODOP उपक्रमाच्या उद्दिष्ट पुर्तीसाठी एकत्रित प्रयत्नांवर भर देण्यात आला आहे. हापुस आंबा या ODOP उत्पादनासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा अर्ज सादर करताना व भौतिक पडताळणी दरम्यान दीपेंद्र सिंह कुशवाह, विकास आयुक्त, उद्योग, एम देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी, रत्नागिरी व श्रीमती. विजु सिरसाठ, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग ठाणे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली याविशेष अभियानात रत्नागिरीनं जिल्ह्यानं हे यश संपादित केले आहे.
पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न ODOP च्या माध्यमातून साकार करण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यातून “एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)” निवडून त्या उत्पादनाचे ब्रँडिंग करणे व प्रोत्साहन देणे जेणेकरून देशांतील संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळेल व देशभरामध्ये समग्र सामाजिक व आर्थिक वाढ शक्य होईल, या संकल्पनेतून ODOP उपक्रम देशामध्ये राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागामार्फत या राष्ट्रीय पुरस्कारासाठी देशातील सर्व जिल्ह्यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते. या राष्ट्रीय पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावरून केलेल्या भौतिक पडताळणीमध्ये महाराष्ट्रातून नाशिक, अमरावती, नागपूर, अकोला, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नांदेड, अहिल्यानगर, बीड, भंडारा, बुलढाणा, धुळे व गोंदिया या 14 जिल्ह्यांची निवड झाली होती. यासाठी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सह व्यवस्थापक ताशी डोर्जे शेर्पा यांनी दि. 26 डिसेंबर 2024 रोजी रत्नागिरी जिल्ह्याला भेट देवून “हापूस आंबा” या उत्पादनाशी निगडीत उद्योगांना प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला होता. यावेळी जिल्हाधिकारी रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांनी ODOP बाबत सादरीकरण केले होते.
“राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) पुरस्कार 2024” चा कार्यक्रम भारत मंडपम, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये “राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) पुरस्कार 2024” साठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या १४ जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील खालील 5 राष्ट्रीय ODOP पुरस्कार 2024 भारत सरकारकडून जाहिर झालेला आहे. महाराष्ट्राची सुवर्णगटामध्ये (in Golden Category) निवड झाली आहे. आणि या 5 जिल्ह्यामधुन ODOP साठी देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला असून देशामध्ये रत्नागिरी जिल्हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
१. रत्नागिरी
२. नाशिक
३. अमरावती
४. नागपूर
५. अकोला
पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये त्यांच्या भाषणात रत्नागिरीच्या “हापूस आंब्याचा” विशेष उल्लेख केला. या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर हे उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रोत्साहनातून आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा या पुरस्कारासाठी पात्र ठरला आहे. तसेच त्यांच्याच प्रेरणेतून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या दोन्ही योजनांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने सन २०२३-२४ व २०२४-२५ या सलग दोन वर्षांमध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे रत्नागिरी जिल्हा राज्यामध्ये अग्रेसर राहिला आहे.
ODOP पुरस्कार म्हणजे जिल्ह्यातून निवडलेल्या उत्पादनाचा विकास, मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती व बाजारातील यशस्वी सादरीकरण करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार भारत सरकारकडून दिला जातो. या पुरस्कारामुळे जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावर ओळख, उत्पादनासाठी नवीन बाजारपेठांची उपलब्धता, उद्योग व कारागीरांना रोजगार व प्रशिक्षण, पर्यटन व आर्थिक विकासाला चालना इत्यादी फायदे रत्नागिरी जिल्ह्याला होणार आहेत.
हापुस आंबा या ODOP उत्पादनासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा अर्ज सादर करताना व भौतिक पडताळणी दरम्यान दीपेंद्र सिंह कुशवाह ( भा.प्र.से) विकास आयुक्त (उद्योग), एम देवेंदर सिंह (भा.प्र.से) जिल्हाधिकारी, रत्नागिरी व श्रीमती. विजु सिरसाठ, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग ठाणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच मिलिंद जोशी ,उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र कृषी पणन मंडळ, शिवकुमार सदाफूले, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी, प्रकाश हणबर, (से.नि) महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी, अजिंक्य आजगेकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी, संकेत कदम, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी, डॉ.पी.इ. शिनगारे, संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली, कोकण हापुस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित यांचे जोशी व भिडे, माविम चा नारीश्रम महिला बचत गट रत्नागिरी, अमर देसाई, देसाई बंधु आंबेवाले, श्रीकांत भिडे, आंबा उद्योजक, मुकुंद खांडेकर, ( से.नि) जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी, बॅंक ऑफ इंडिया रत्नागिरी, विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी, पिरजादे, NIC रत्नागिरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
***


















