Home Uncategorized *अंबादास दानवेंनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली नाही* *निरोप समरंभावेळी आ. दरेकरांकडून कौतुकोदगार*

*अंबादास दानवेंनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली नाही* *निरोप समरंभावेळी आ. दरेकरांकडून कौतुकोदगार*

74
0

मुंबई – मुंबईत विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आज पार पडला. यावेळी निरोपादाखल भाषणात भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी अंबादास दानवे यांनी विरोधी पक्ष नेते पदी असताना केलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच अंबादास दानवे यांनी पक्ष बदलला तरी विचारधारा सोडली नाही. त्यांनी कधीही हिंदुत्वाशी प्रतारणा केली नाही, असे कौतुकोदगारही काढले. यावेळी आपल्या भाषणात दरेकरांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनाही चिमटे काढले.

दरेकर म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांची काय ताकद असते,तो विरोधी पक्षात असला तरी सर्वसामान्यांना न्याय कसा देऊ शकतो हे स्वतः मी त्या पदावर काम करुन अनुभवलेय. उद्धव ठाकरे आज अंबादास दानवे यांच्यावर जास्त वेळ बोलतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यातूनही त्यांनी टोमणे मारायचे सोडले नाही. निरोप समारंभावेळी राजकारणाची दिशा बाजूला ठेवली पाहिजे. फडणवीस पुन्हा येईन बोलले आणि ते आले. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून आले. महाराष्ट्राच्या जनतेने वाढलेले ताट कुणी लाथाडले हे सर्वांना माहित आहे. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते तुम्ही दिले नाहीत, तुम्हाला टिकवता आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. म्हणून शिंदे यांच्या उठावाला लोकं बंडखोरी समजले नाही तर शिवसैनिक, जनतेसाठी उठाव केला हे चित्र महाराष्ट्राने पाहिले असल्याचे दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, बाळासाहेबांची जी शिकवण आहे त्याचा तंतोतंत विचार वेगवेगळ्या टप्प्यावर करताना दानवे दिसले. त्यांनी सभागृहात अनेकवेळा चांगल्या प्रकारची आक्रमक भाषणे केलीत. परंतु आपली साधनसुचिता कधी सोडली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, राजकीय वारसा नाही, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाही. असा छोटा माणूस मोठ्या पदावर जातो तेव्हा त्याचे कौतुक केले जाते. अंबादास दानवे यांनी अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रमातून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रामीण भागात विरोधी पक्षनेता असताना ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोचायचे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने नेतृत्व घडवले. ते आता विरोधी पक्षनेता नसले तरी अंबादास दानवे कोण हे महाराष्ट्रातील जनता विचारणार नाही. त्यांची कारकीर्द महाराष्ट्राला माहित आहे. दानवे यांची ओळख सामाजिक कार्यकर्ता, विरोधी पक्षनेता म्हणून सभागृहाला आहे ती पुसता येणार नाही. त्यांच्यासारखे नेतृत्व राजकारणात टिकवले पाहिजे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही दरेकर म्हणाले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here