रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे रिजिनल कमिशनर यांचे आवाहन..
कांदिवली वार्ताहर 9
अनिल चासकर
भारत सरकारच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ) वतीने,विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये, मोठ्या प्रमाणात औपचारिक रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने “”रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना’ (ईएलआय योजना) मंजूर केली आहे.सदर
योजना रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, नोकरीसाठी पात्रता वाढवण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षेसाठी सर्व क्षेत्रांमध्ये, विशेषतः उत्पादन क्षेत्रात, उपयुक्त ठरणार असल्याचे कांदिवली चारकोप येथील प्रादेशिक कार्यालय भविष्य निर्वाह निधी चे रिजिनल कमिशनर प्रेम प्रकाश यांनी सांगितले आहे.
जे कर्मचारी प्रथमच ईपीएफओमध्ये नोंदणीकृत झाले आहेत, त्यांना सलग ६ व १२ महिने सेवा पूर्ण केल्यानंतर व आर्थिक साक्षरता कार्यक्रमात यशस्वी सहभाग घेतल्यास, दोन हप्त्यांमध्ये एक महिन्याचे वेतन (कमाल ₹१५,०००) दिले जाईल. जे आस्थापना अधिक कर्मचारी नियुक्त करतात, त्यांना प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यासाठी त्यांच्या वेतनाच्या स्तरावर आधारित प्रतिमाह ₹३,००० पर्यंत प्रोत्साहन मिळू शकते, कर्मचारी किमान ६ महिने कार्यरत
असला पाहिजे. उत्पादन क्षेत्रामध्ये हे प्रोत्साहन तिसऱ्या आणि चौथ्या वर्षांपर्यंत विस्तारित करण्यात येईल.
ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन १००,००० पर्यंत आहे, ते या योजनेस पात्र असतील.
ही योजना पुढील २ वर्षाच्या कालावधीत ३.५ कोटींपेक्षा जास्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवते, यामध्ये १.९२ कोटी प्रथमच नोकरीत प्रवेश करणाऱ्या कामगारांचा समावेश आहे.
पात्रतेसाठी, रोजगार निर्मिती १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीत झाली पाहिजे.
पात्र कर्मचाऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer DBT) द्वारे आधार ब्रिज पेमेंट सिस्टीम (ABPS) च्या माध्यमातून रक्कम दिली जाईल आणि नियोक्त्यांना देय प्रोत्साहन त्यांच्या पॅन लिंक केलेल्या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल.
सर्व पात्र कर्मचारी व नियोक्त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ई पी एफ ओ चे रिजिनल कमिशनर प्रेम प्रकाश यांनी केले आहे.


















