Home Uncategorized *माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करू नये : मंत्री संजय राठोड*

*माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करू नये : मंत्री संजय राठोड*

70
0

मुंबई, ९ जून

माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करू नये, अशी परखड प्रतिक्रिया राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. रविवारी नांदेड येथील बंजारा समाजाच्या संवाद मेळाव्यात आपण केलेल्या वक्तव्याचा काही माध्यमांनी विपर्यास करून, माझा उद्धव ठाकरे गटाशी संबंध असल्याच्या बातम्या दिल्या आहेत. प्रत्यक्षात मी असा कोणताही दावा अथवा विधान केलेले नाही. माझा विश्वास महायुती सरकारवर व शिवसेना व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री संजय राठोड रविवारी नांदेड येथील बंजारा समाजाच्या संवाद बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत त्यांनी बंजारा समाजाच्या विविध समस्या आणि उपाययोजना यावर भाष्य केले. त्यावेळी बंजारा भाषेत बोलताना, राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी असली तरीही राज्याच्या विकासासाठी नेत्यांमध्ये मतभेद नसावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. बंजारा समाजातील बांधवांनी आपण कोणत्या पक्षात काम करतो, यापेक्षा समाजाच्या प्रगतीचा विचार केला पाहिजे, असे सांगताना त्यांनी वरिष्ठ पातळीवर मोठे नेते एकमेकांच्या संपर्कात असतात. इतकेच नव्हे तर विकासात्मक व धोरणात्मक मुद्यांवर एकमेकांना सहकार्य देखील करतात, असे ते म्हणाले. उदाहरण देताना शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांचे त्यांनी उदाहरण दिले. सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते धोरणात्मक मुद्यांवर एकमेकांच्या संपर्कात असतात, असे त्यांना म्हणायचे होते. विकासकामे आणि राज्याच्या प्रगतीच्या मुद्यावर नेते एकमेकांशी बोलत असतात, तसेच समाजहिताच्या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा पक्ष वेगळे असले तरी एकमेकांशी संवाद ठेवावा, असे मंत्री संजय राठोड यांना म्हणायचे होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क असल्याचा गैरसमज पसरवणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

शिवसेना प्रमुख व उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास असून, महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. विरोधकांना यातून पोटशूळ होत असल्याने माध्यमांना हाताशी धरून अफवा पसरविण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

माध्यमांनी कोणत्याही बातम्या प्रसिद्ध करताना त्याची खात्री करूनच बातमी द्यावी. कोणत्याही नेत्यावर विनाकारण टिप्पणी करू नये, अशी विनंतीही त्यांनी माध्यमांना केली आहे. आम्ही महायुती सरकार म्हणून राज्याला नवी दिशा देत आहोत. मात्र विरोधकांकडे कोणतेही विकासाचे मुद्दे नसल्यामुळे अशा पद्धतीचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे अशा चुकीच्या बातम्यांकडे नागरिकांनी व माध्यमांनी दुर्लक्ष करावे, असे आवाहनही मंत्री संजय राठोड यांनी यावेळी केले.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here