*सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून योजनेतील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत*
*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
मुंबई, दि २८ – छत्रपती संभाजीनगर शहराची पाणी पुरवठा योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा. तसेच सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. योजना 100 टक्के पूर्ण झाल्यानंतरच समाधान होणार आहे. ठेकेदारांना काम करताना येणाऱ्या अडचणी महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून सोडवाव्यात आणि ठेकेदारांनीही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्र सामग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
पाणी पुरवठ्यासाठी जॅकवेल महत्वाचे असून त्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून पाणी उपसा सुरू करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या योजनेतील २६ एम एल डी पाणी पुरवठा करणारा टप्पा जून अखेरपर्यंत पूर्ण करावा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अपूर्ण असलेले काम लवकर होण्याच्या दृष्टीने पूर्व अभियांत्रिकी पद्धतीने काम करण्यास ठेकेदारास तातडीने मान्यता द्यावी. पाईप लाइन टाकण्याच्या कामात गॅप आहेत. ते पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेने १५ जून नंतर शटडाउन घ्यावा आणि ठेकेदारांनी ते काम ऑगस्ट अखेर पर्यंत पूर्ण करावे. आरओडब्लूचे काम एक आठवड्यात मार्गी लावावे, ठेकेदाराने किमान 35 ईएसआर आणि जीएसआर पूर्ण करून द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या योजनेचे इतके टक्के काम पूर्ण अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित नाहीत. अशा उत्तराने समाधान होणार नाही. १०० टक्के काम पूर्ण झाल्यानेच समाधान होणार आहे. या योजनेतील पाणी पुरवठ्याच्या टाक्या तातडीने कार्यन्वीत करण्यासाठी ठेकेदाराने नियोजन करावे. ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत या पाणी टाक्यांची कामे पूर्ण करावीत. यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिकांनी समन्वयाने काम करावे. कामामध्ये खंड पडू नये यासाठी महानगरपालिकेला ८२२ कोटी रुपयांचा कर्ज निधी उभारण्याची मंजुरी तातडीने द्यावी. तसेच याच्या व्याजामध्ये असलेला जास्तीचा दर फरक शासन स्तरावरून भरून द्यावा. पाणी पुरवठ्याचे हायड्रॉलिक टॅप कार्यान्वित करावे आणि त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर असावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्यास त्याला कळ्या यादीत टाकण्यात येईल. पोलिस, महानगर पालिका आणि जीवन प्राधिकरण यांनी सामन्याने काम करून ही योजना वेळेत पूर्ण करावी. पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांचे काम तातडीने पूर्ण करावे.
यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000
















