Home महाराष्ट्र एकमेकींचा सन्मान राखणे, प्रेरणा देणे आणि संकटात मदतीला धावून जाणे; हीच खरी...

एकमेकींचा सन्मान राखणे, प्रेरणा देणे आणि संकटात मदतीला धावून जाणे; हीच खरी ‘लाडकी बहीण’ संकल्पना”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

90
0

*“एकमेकींचा सन्मान राखणे, प्रेरणा देणे आणि संकटात मदतीला धावून जाणे; हीच खरी ‘लाडकी बहीण’ संकल्पना”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

*नांदेडमध्ये शिवसेना महिला आघाडीचा मेळावा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली महिलांचा सशक्त आवाज*

नांदेड, दि. १७ मे : “महिलांच्या अंगी नेतृत्वगुण, संवेदनशीलता आणि बांधिलकी असते. या गुणांमुळे त्या समाजपरिवर्तनाच्या अग्रस्थानी राहतात. त्यामुळे आरक्षण हे फक्त एक माध्यम आहे, पण खऱ्या अर्थाने पुढे जायचं असेल, तर आपल्या स्वतःमधील क्षमतेवर विश्वास ठेवावा लागतो,” असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. त्या नांदेड येथे आयोजित शिवसेना महिला आघाडीच्या मेळाव्यात बोलत होत्या.

या मेळाव्याचे आयोजन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजन महिला जिल्हाप्रमुख श्रीमती वनमाला राठोड व श्रीमती गीता पुरोहित, श्रीमती अपर्णा नेरळकर, श्रीमती शितल भांगे पाटील यांनी केले. यावेळी आमदार श्री. बालाजी कल्याणकर, आमदार श्री. बाबुराव कोहळीकर, आमदार श्री. आनंद बोंडारकर, मराठवाडा सचिव श्री. अशोक पटवर्धन, श्रीमती लक्ष्मी नरहिरे संपर्कप्रमुख, श्रीमती अंजली मांडवकर संपर्कप्रमुख ग्रामीण व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना सामाजिक, आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सशक्त करण्याच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. “प्रत्येक महिलेने स्वतःला केवळ कुटुंबापुरती मर्यादित न ठेवता समाजासाठी सक्रिय व्हावे. पक्ष संघटना आणि विकास यामध्ये आपले योगदान देण्याची ही वेळ आहे,” असे त्या म्हणाल्या.

महिलांच्या आरोग्यासंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. “२५ मेनंतर मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. यामध्ये रक्त, कॅल्शियम, डोळे, स्तन कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग यांसारख्या तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच ज्या महिलांच्या शरीरात लोह किंवा कॅल्शियमची कमतरता आढळेल, त्यांना मोफत औषध वाटप करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सर्व महिला कार्यकर्त्यांना आपल्या भागातील महिलांची नोंदणी करण्याचे आवाहन केले.

घरकाम करणाऱ्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी महसूल विभागाच्या मदतीने शिबिरे आयोजित करण्याचा मनोदयही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, ज्या महिलांकडे आधार कार्ड नाही, त्यांची ओळख घरमालकाच्या प्रमाणपत्राच्या आधारे निश्चित करून लाभ मिळवून देण्याची कार्यवाही केली जाईल.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या बळकटीकरणावरही डॉ. गोऱ्हे यांनी भर दिला. “महिला बचत गटांना व्यवसायासाठी केवळ भांडवलच नव्हे, तर उत्पादन विक्री, प्रशिक्षण व विपणनासाठीही शासनाची मदत दिली जाणार आहे. विक्री केंद्रे उभारणे, प्रदर्शनांच्या माध्यमातून गटांना संधी मिळवून देणे आणि त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी ‘लाडकी बहीण’ या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्याची गरजही अधोरेखित केली. “एकमेकींचा सन्मान राखणे, प्रेरणा देणे आणि संकटात मदतीला धावून जाणे, हीच खरी ‘लाडकी बहीण’ संकल्पना आहे, जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आपण सर्वत्र पोहोचवत आहोत,” असे त्या म्हणाल्या.

तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सरकारी दाखल्यांसाठी आणि इतर कागदपत्रांसाठी महसूल विभागाच्या सहकार्याने मोफत शिबिरे आयोजित करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. “ही योजना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या संकल्पनेतून साकारली जात असून, त्यातून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल,” असे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here