मुंबई शहर जिल्ह्यात मतदार जागरूकता अभियान
मुंबई शहर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे सहा ठिकाणी पदयात्रा
मुंबई, दि. ८ नोव्हेंबर, २०२४ :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. संजय यादव यांच्यातर्फे प्राप्त निर्देशांनुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीप सेलच्या वतीने शहरातील सहा ठिकाणी मतदार जागरूकता अभियानाअंतर्गत पदयात्रा काढून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.

नवमतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने ‘सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टीसिपेशन (स्वीप) हे अभियान हाती घेतले आहे. मुंबई शहर जिल्ह्यांतील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरचे ‘स्वीप’ विभागाचे समन्वय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा, मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावा, हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा अभियानाचा मूळ उद्देश आहे

मुंबई शहरात महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व बचत गटाच्या महिलाही मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झाल्या. मतदान करा; लोकशाही बळकट करा, अशा आशयाचे फलक हातात घेऊन मतदानाविषयी लोकांमध्ये जनजागृती केली.
मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडिया-जेट्टी नं. –नॉर्थ कोर्ट-रेडिओ क्लब-पी. रामचंदानी मार्गावरून पहिला मार्ग होता. मार्ग क्र. २ (१७८-धारावी) मुंबई पब्लिक स्कूल धारावी ट्रांन्झीट कॅंम्प स्कूल संकुल, एम.जी.एम. मार्ग, मुंबई-१७-ट्रांन्झीट कॅंम्प-एम.जी.रोड, मार्ग क्र. ३ (१७९ सायन-कोळीवाडा) केंद्रीय विद्यालय, एस.एम. रोड, ऍन्टॉप हिल, मुंबई-३७-नुरा बाजार-बंगालीपुरा असा होता. मार्ग क्र. ४ (१८२ वरळी) बृहन्मुंबई महानगरपालिका ग्लोब मिल पॅसेज स्कूल नं.२, पांडुरंग बुधकर मार्ग, मुंबई-१३-महिंद्रा टॉवर, मार्ग क्र.५ (१८५ मलबार हिल) १० वी लेन, खेतवाडी-ए.बी.कोल्हटकर मार्ग-खेमराज दास मार्ग असा तर मार्ग क्र.६ (१८७ कुलाबा) पी. एम. श्री केंद्रीय विद्यालय क्र.१, होमी भाभा रोड, नेव्हीनगर, कुलाबा-गणेश मूर्तीनगर-धोबी घाट, आंबेडकरनगर येथून प्रचार करून पदयात्रा काढण्यात आली.
मुंबई शहर स्वीप प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.



















