लेखकांना महत्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या ‘अस्तित्व’, बेस्ट कला क्रीडा, मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट संयुक्त विद्यमाने आयोजित कै. श्री. “मु.ब.यंदे पुरस्कृत” ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ २०२४ (सयुंक्त वर्ष ३८ वे) या स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा गाजली ती सेलिब्रेटी स्पर्धकांमुळे.
या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात,याचा प्रत्यय यंदाही आला. यंदा प्राथमिकमध्ये अनेक व्यावसायिक रंगकर्मी सहभागी झाले होते. त्यापैकी राजेश देशपांडे, वर्षा दांदळे, दिशा दानडे, सुहास लाखन, बॉबी, गिरीश सावंत आणि शशांक जाधव हे यंदाच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या स्पर्धकांपैकी काही मान्यवर चेहरे आहेत.
यंदाच्या स्पर्धेच्या विषय सूचक आहेत ज्येष्ठ अभिनेते आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. मोहन आगाशे आणि त्यांनी विषय सुचवला आहे “मरणोत्तर” (मरण पश्चात आयुष्य) (Life After Death). या विषयाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारया एकांकिका या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर झाल्या.प्राथमिक फेरीचे परीक्षण नीळकंठ कदम आणि अक्षय शिंपी या मान्यवरांनी केले.
यातून निवडलेल्या पाच एकांकिकांची अंतिम फेरी शनिवारी ०५ ऑक्टोबरला दुपारी ०३:३० वाजल्यापासून माटुंगा इथल्या यशवंत नाट्य मंदिर नाट्यसंकुलात संपन्न होईल.रंगभूमीच्या अभिवृद्धीसाठी या स्पर्धेचे संयुक्तपणे आयोजन करण्याचा निर्णय बेस्ट कला आणि क्रीडाने घेतला आहे.
सोहम साधना ग्रुप निर्मित, प्रणव सखदेव ह्यांच्या कथेवर आधारित, महेंद्र डोंगरे लिखित/दिग्दर्शित ‘आठ्वलेची एक आठवण’, नाट्यवेल्हाळ निर्मित, यतीन सावंत लिखित, कमलाकर लोखंडे दिग्दर्शित “एट द डोरस्टॅप्स”. ऑक्सिपिटल प्रॉडकशन्स, मुंबई निर्मित शशांक जाधव लिखित, गिरीश सावंत दिग्दर्शित लाईफ २.O जिराफ थिएटर्स निर्मित, बॉबी (राकेश जाधव) लिखित / दिग्दर्शित “अत्तरमन” आणि अथर्व थिएटर्स निर्मित, वर्षा दांदळे लिखित/दिग्दर्शित “लाईट गेलीय का ?” या पाच वेगवेगळ्या अभिव्यक्तीच्या एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या असून त्यातल्या मान्यवर अभिनेता – तंत्रज्ञांमुळे यंदाच्या कल्पना एकची अंतिम फेरी चुरशीची ठरेल असा अंदाज आहे.
ऑनलाईन तिकीट विक्री https://tickethub.co.in/ या संकेतस्थळावर सुरु. अधिक माहितीसाठी संपर्क – अस्तित्व : +९१ ९०८२६३३२८८*

















