Home मुंबई *‘चित्रपताका’ महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण संपन्न!*

*‘चित्रपताका’ महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण संपन्न!*

9
0

*‘चित्रपताका’ महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण संपन्न!*

*सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मंत्रालयात संकेतस्थळाचे उद्घाटन; महोत्सवाच्या नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ*

– www.chitrapataka.com वर महोत्सवाची संपूर्ण माहिती आणि सहभाग नोंदणीची सुविधा उपलब्ध
– १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे रंगणार महोत्सवाचे यंदाचे पर्व

*मुंबई (बुधवार, ०४ नोव्हेंबर २०२६) :* महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवा’च्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनातून करण्यात आले. १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे महोत्सवाचे यंदाचे पर्व रंगणार असून www.chitrapataka.com या संकेतस्थळावर या महोत्सवाची माहिती आणि सहभाग नोंदणीची सुविधा बुधवारपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यंदाच्या चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवात जवळपास ३५ आशयघन मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती, ७ कार्यशाळा आणि विविध उपक्रमांची पर्वणी असणार आहे. महोत्सवातील विविध सत्रांची माहिती आणि आवश्यक तपशील प्रेक्षकांना सहज उपलब्ध व्हावेत आणि त्यांना महोत्सवासाठी नोंदणी करता यावी, यासाठी महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या रूपाने डिजिटल व्यासपीठ म्हणून महामंडळाकडून www.chitrapataka.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. बुधवारी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, महोत्सवासाठी जमा होणारे नोंदणी शुल्क राज्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द करण्यात येणार असून अधिकाधिक प्रेक्षकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे. तसेच कलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आमचा प्रयत्न असून अधिकृत संकेतस्थळाद्वारे सिनेप्रेमींनी या महोत्सवाशी जोडले जावे आणि हा महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी याप्रंसगी केले.

यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी संकेतस्थळ निर्मितीमागील भूमिका विशद केली. डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाचा विचार करून महोत्सवाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे, प्रेक्षकांना कार्यक्रमांशी सहजपणे जोडणे आणि महोत्सवातील सहभागाची प्रक्रिया सुलभ करणे, या उद्देशाने अधिकृत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. संकेतस्थळामुळे महोत्सवाच्या प्रसिद्धीला व्यापक डिजिटल व्यासपीठ मिळणार असून महाराष्ट्रासह देश-विदेशातील मराठी चित्रपटप्रेमींनाही महोत्सवासंबंधित माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी यावेळी दिली.

*महोत्सवाची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर!*

‘चित्रपताका’ महोत्सवाच्या अधिकृत www.chitrapataka.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून महोत्सवाशी संबंधित सर्व माहिती चित्रपटप्रेमी, प्रेक्षक, चित्रपटकर्मी आणि माध्यम प्रतिनिधींना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महोत्सवाचे स्वरूप, कार्यक्रमांचे तपशील, प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची माहिती, विशेष उपक्रम तसेच महोत्सवाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी या संकेतस्थळावर जाणून घेता येणार आहेत. विशेष म्हणजे, महोत्सवात सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी सुविधादेखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरून आपली नोंदणी करता येणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी तसेच कार्यक्रमांचे अद्ययावत तपशील जाणून घेण्यासाठी चित्रपटप्रेमींनी www.chitrapataka.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

*’पुस्तक ते सिनेमा’ आणि ‘लघुपट स्पर्धा’ उपक्रमांची अर्जनोंदणी संकेतस्थळावर सुरू’*

यंदाच्या चित्रपताका महोत्सवात ‘पुस्तक ते सिनेमा’ या विशेष उपक्रमाद्वारे सिनेमाध्यमात माध्यमांतर होण्याची क्षमता असलेल्या प्रकाशित पुस्तकांच्या लेखकांना चित्रपटकर्मी, निर्माते व पटकथाकार यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ‘महाराष्ट्र माझ्या नजरेतून…’ या १८ ते २५ वयोगटातील तरुणाईसाठी विशेष लघुपट स्पर्धेचे आयोजनही महोत्सवात करण्यात आले आहे. या दोन्ही उपक्रमांत सहभागी होण्यासाठी अर्जनोंदणी प्रक्रिया आणि अनुषंगिक माहिती बुधवारपासून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

…………………..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here