*५हजारात दिवाळी करून दाखवा — मुख्यमंत्री फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळ यांचं थेट आव्हान!*
*मुंबई (MyMedia24) -* शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकारने ५ हजार रुपये देऊन बळीराजाची क्रूर थट्टा केली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गगनाला भिडलेल्या महागाईत ५ हजारात दिवाळी करून दाखवावी, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष *हर्षवर्धन सपकाळ* यांनी आज टिळक भवन येथे केला.
*कोकण विभागाची बैठक —*
प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत कोकण विभागातील लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी आणि जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक पार पडली. सहप्रभारी यू. बी. व्यंकटेश, वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील उपस्थित होते. उद्या नाशिक येथे उत्तर महाराष्ट्राची बैठक होणार आहे.
*सपकाळ काय म्हणाले? — ३मोठे मुद्दे*
*१. बळीराजाची थट्टा —*
सरकारने दिवाळी आली तरी मदत पोहोचवली नाही. फक्त ५ हजार रुपये देऊन थट्टा केली. हेक्टरी १ लाख रुपये देण्यास सरकार टाळाटाळ करतंय. हे सरकार फक्त मोजक्या उद्योगपतींचं आहे, शेतकऱ्यांचं नाही.
*२. टुलकीट वापरून काँग्रेसला बदनाम करण्याचा डाव —*
भाजपाने सर्व मर्यादा सोडल्या आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावरील महारॅलीच्या वेळी बसमधील दोन काँग्रेस खासदारांच्या व्हिडिओचा काही सेकंदाचा भाग व्हायरल करून काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. त्या दोन्ही खासदारांचं बहिण-भावाचं नातं आहे, त्यांच्या नात्यावर संशय घेऊन भाजपाने महिला खासदाराचाही अपमान केला आहे. कोणी तक्रार केली नाही, पण फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपावर काँग्रेस योग्य यंत्रणेकडे तक्रार दाखल करेल.
*३. गोकुळवर कब्जा करण्याचा डाव —*
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ) निवडणुकीत सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदारांनी कौल दिला. महायुतीचा धुव्वा उडाला. पण आता ५ शासनमान्य सदस्य नेमून त्यातील ४ जणांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा संविधान आणि लोकशाही धुडकावून गोकुळवर कब्जा मिळवण्याचा डाव आहे.
—





















