Home मुंबई *मुंबईत बांधकामे आठवड्यातून एक दिवस बंद ठेवा*

*मुंबईत बांधकामे आठवड्यातून एक दिवस बंद ठेवा*

11
0

*मुंबईत बांधकामे आठवड्यातून एक दिवस बंद ठेवा*

*मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची महापालिका आयुक्तांना सूचना*

मुंबई, दि. २४ ऑक्टोबर : २०२६
मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे आणि पाडकामे बंद ठेवण्यात यावीत, अशी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्राद्वारे केली आहे. हिवाळ्यात वायुप्रदूषणाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सूचित केले आहे.
मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाबाबत नागरिकांकडून अनेक निवेदने प्राप्त झाली असून, मुंबई उच्च न्यायालयानेही हवेच्या खालावत चाललेल्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली आहे, असे शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे. महानगरपालिकेने बांधकामस्थळांवरील प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना, विभागस्तरावरील तपासणी पथके, केंद्रीय हवा गुणवत्ता डॅशबोर्डच्या माध्यमातून ३,१६६ बांधकामस्थळांवर ठेवण्यात येणारी देखरेख, राडारोडा नियंत्रण प्रणाली, बेकऱ्यांमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर आणि स्मशानभूमींमधील प्रदूषण नियंत्रण यंत्रणा यांसारख्या प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले आहे. २०१७-१८ पासून मुंबईतील पीएम-१० प्रदूषणाच्या पातळीत सुमारे ४८ टक्क्यांनी घट झाल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र, प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी व्यापक उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईसाठी स्वतंत्र श्रेणीबद्ध कृती आराखडा (Graded Response Action Plan) तयार करून हवेची गुणवत्ता खालावताच पूर्वनिश्चित उपाययोजना तातडीने लागू करण्याची व्यवस्था असावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. प्रदूषणग्रस्त भाग आणि प्रमुख वाहतूक मार्गांवर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करून रस्ते धुणे व पाण्याची फवारणी करणे, रात्रीच्या वेळी यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छ करणे, खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि खोदकामानंतर रस्ते पूर्ववत करण्याची कामे वेळेत पूर्ण करणे, यावरही त्यांनी भर दिला आहे.
कचरा जाळणे, कचरा डेपोतील आगी आणि बांधकामाचा राडारोडा बेकायदेशीरपणे टाकण्याच्या घटनांची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन व समाजमाध्यम खाते सुरू करावे. तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी आणि कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रदूषणाची तीव्रता अधिक असलेल्या ठिकाणी आणि प्रमुख वाहतूक चौकांमध्ये अँटी-स्मॉग गन व मिस्ट स्प्रेअरचा वापर करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
मुंबई वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समन्वयातून धूर सोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची तपासणी वाढवावी आणि वैध प्रमाणपत्र नसलेल्या अवजड वाहनांना मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करावा, असेही शेलार यांनी सुचविले आहे. या उपाययोजना मुंबईपुरत्या मर्यादित न ठेवता मुंबई महानगर प्रदेशातील सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बांधकामस्थळांवर सेन्सर-आधारित हवा गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा बसविण्याची प्रलंबित कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, तसेच लाकूड किंवा कोळशाचा वापर करणाऱ्या उर्वरित ८७ बेकऱ्यांचे स्वच्छ इंधनावर रूपांतर करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

उद्योगांनी कोळशाऐवजी हरित इंधनाचा वापर करावा
मुंबई महानगर प्रदेशातील उद्योगांच्या इंधन वापराचा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंटच्या अहवालानुसार, या प्रदेशातील उद्योग ऊर्जा आणि इंधनासाठी सुमारे २० लाख टन कोळशाचा वापर करतात. या उद्योगांना स्वच्छ व हरित इंधनाकडे वळण्यासाठी कमी व्याजदराची कर्जे, सरकारी करांमध्ये सवलती आणि हरित ऊर्जा निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा विचार करावा, असे त्यांनी सुचविले आहे.
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सार्वजनिक व खासगी वाहतूक वाहनांचे विद्युतीकरण करण्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात, तसेच वाहन उद्योग आणि खासगी कंपन्यांचा या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
वायुप्रदूषणाविरोधातील लढ्यात नागरिक, युवक आणि उद्योग क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत, मुंबईतील सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये नागरिकांच्या संघटना, लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय विभागांच्या बैठका आयोजित करून स्थानिक समस्यांवर उपाययोजना निश्चित कराव्यात, अशी सूचना शेलार यांनी केली आहे. याशिवाय, उद्योग क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेऊन प्रदूषण नियंत्रणासाठी त्यांचे सहकार्य, तांत्रिक मदत आणि आर्थिक सहभाग मिळवावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. मुंबईतील वायुप्रदूषण ही नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवनमानाशी निगडित गंभीर समस्या असून, उपलब्ध यंत्रणेचा प्रभावी वापर करून विविध विभागांमध्ये समन्वय साधत तातडीने आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे अ‍ॅड. आशिष शेलार यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here