Home मुंबई *बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महिला बचत गटांचा मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ पुन्हा एकदा...

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महिला बचत गटांचा मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत*

23
0

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महिला बचत गटांचा मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत*
 
*आठवड्याचा प्रत्येक बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार सी फूड प्लाझा*
 
मुंबईकरांना दर्जेदार, ताज्या आणि चविष्ट अशा माशांच्या मेजवानीचा आस्वाद उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील पहिला सी फूड प्लाझा माहीम चौपाटी परिसरात पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. शनिवार (दिनांक २४ ऑक्टोबर २०२६) पासून माहीम सी फूड प्लाझा येथे महिला बचत गटांचे स्टॉल्स् कार्यरत झाले आहेत. हा सी फूड प्लाझा आठवड्यात दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी खुला राहणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते तथा जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष यशवंत किल्लेदार, मराठी अभिनेते कमलाकर सातपुते,जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई आदींसह महानगरपालिकेचे अधिकारी, बचत गटाच्या सदस्य महिला उपस्थित होत्या.

आकर्षक रंगसंगती, सेल्फी पॉइंट, आरामदायी आसन व्यवस्था आणि स्थानिक कोळी गीतांचा आणि पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
मुंबईतील कोळीवाड्यांच्या ठिकाणी सुशोभीकरण करतानाच महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटन वृद्धीसाठी मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ माहीम चौपाटी लगत सुरू करण्यात आला. मागील काही वर्षांपासून या सी फूड प्लाझाला हजारो पर्यटकांनी आतापर्यंत भेट दिली आहे.
 
माहीम चौपाटी स्थित सी फूड प्लाझाच्या ठिकाणी आकर्षक अशा रोशणाई करण्यात आली आहे. नागरिकांना आणि पर्यटकांना सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी छायाचित्रं घेण्याचीही उत्तम व्यवस्था उपलब्ध आहे. या महिला बचत गटांना मत्स्य उत्पादनावर आधारित प्रशिक्षणही देण्यात आले आहे. व्यवसाय कौशल्य विकसित होतानाच महिलांचे जीवनमान उंचावेल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्था वाढीस लागण्यासोबतच विकासही होईल, याचा प्रयत्न बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे.
 
मुंबईतील कोळीवाडे आणि येथील खाद्यसंस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कोळीवाड्यांचे संवर्धन आणि कोळी खाद्यसंस्कृतीला चालना देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देऊन कोळी संस्कृती आणि कोळी खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहित करावे, असे आवाहन जी (उत्तर) विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी केले आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here