*MAI MEDIA 24 – एक्सक्लुझिव्ह – १०.३० वाजता*
*६.६ कोटी वर्ष जुना जागतिक वारसा धोक्यात! अंधेरीचा गिल्बर्ट हिल विकला जातोय! मनपा आणि सरकार झोपलेत का?*
*मुंबई, २२ ऑक्टोबर:*
अंधेरीचा गिल्बर्ट हिल हा ६.६ कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या लाव्हापासून तयार झालेला एक अद्भुत चमत्कार आहे. जगात अशा प्रकारच्या बेसॉल्ट कॉलमच्या टेकड्या फक्त तीनच ठिकाणी आहेत. अमेरिका, आणि आपल्या मुंबईतील अंधेरीचा गिल्बर्ट हिल. हा केवळ दगड नाही, तर हा जागतिक वारसा आहे. पण आज हाच वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
*MAI MEDIA 24 चा ग्राउंड रिपोर्ट – गिल्बर्ट हिल कसा मरतोय?*
*१) अनधिकृत खाणकाम सुरूच आहे.* गिल्बर्ट हिलच्या आजूबाजूची जमीन ही सरकारच्या महसूल विभागाच्या मालकीची आहे. त्या जमिनीवर गेली अनेक वर्षे अनधिकृतपणे दगड फोडण्याचे आणि खाणकाम करण्याचे काम सुरू आहे. या खाणकामाची धूळ थेट हवेत मिसळते आणि अंधेरी, जोगेश्वरी, वर्सोवा आणि जुहू परिसराचा AQI वाढवते. सरकार हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत बसले आहे.
*२) संरक्षक भिंतच बांधली नाही.* या टेकडीचे जतन व्हावे म्हणून न्यायालयाने अनेक वर्षांपूर्वीच या टेकडीभोवती संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश दिले होते. पण मनपा आणि सरकारने आजपर्यंत ती भिंत बांधली नाही. त्यामुळे टेकडी उघडी पडली आहे आणि कोणीही तिथे जाऊन नुकसान करू शकते.
*३) Grade II चा खेळ.* जगातील दुर्मिळ टेकडीला मनपाने केवळ Grade II चा वारसा दर्जा दिला आहे. Grade I चा दर्जा दिला असता तर या टेकडीला कोणीही हात लावू शकला नसता. पण Grade II असल्यामुळे तिच्या आसपास बांधकामांना आणि तोडफोडीला वाव मिळतो. हा दर्जा जाणूनबुजून कमी ठेवला का, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत.
*४) ५.५ कोटीच्या जाळ्या लावून टेकडीला जिवंत ठेवले जातेय.* आज ही टेकडी कोसळू नये म्हणून ५.५ कोटी रुपये खर्च करून तिच्यावर स्टीलच्या मोठ्या जाळ्या लावाव्या लागल्या आहेत. म्हणजे नैसर्गिक वारशाला जाळीत बंद करून ठेवण्याची वेळ आली आहे. ही जाळी टेकडीला वाचवण्यासाठी नाही, तर मनपा आणि सरकारच्या बेजबाबदारपणाला झाकण्यासाठी लावली आहे, अशी टीका होत आहे.
या एकाच टेकडीकडे बघितले तरी मुंबईत प्रदूषण का वाढते याचे उत्तर मिळते. टेकडी फोडली की धूळ उडते, धूळ उडाली की AQI वाढतो, AQI वाढला की मुंबईकरांचा जीव घुसमटतो. आणि याला जबाबदार कोण? तर फक्त दंडाचा दिखावा करणारी यंत्रणा.
म्हणूनच MAI MEDIA 24 ची मागणी आहे, गिल्बर्ट हिल हा केवळ अंधेरीचा नाही तर संपूर्ण जगाचा वारसा आहे. त्याला तात्काळ Grade I चा दर्जा द्यावा, अनधिकृत खाणकाम करणाऱ्यांना गजाआड करावे आणि न्यायालयाने स्युमोटोने कारवाई करून या वारशाला वाचवावे.
*गिल्बर्ट हिल वाचवा, मुंबईचा श्वास वाचवा!*
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | https://maimedia24.com*
—






















