*महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद! विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी समितीवर नियुक्ती*
*मुंबई, दि. २३ ऑक्टोबर २०२६*
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA), महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सह-अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या (CPA) आंतरराष्ट्रीय कार्यकारी समितीवर भारत विभागाचे प्रतिनिधी (Regional Representative) म्हणून नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळ आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची व अभिमानास्पद बाब आहे. या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती तथा CPA महाराष्ट्र शाखेचे सह-अध्यक्ष प्रा. राम शिंदे, उप सभापती सचिन अहिर आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी अभिनंदन केले आहे.
कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन, हाऊस ऑफ पार्लमेंट, लंडनचे उपमहासचिव श्री. जार्विस मातिया यांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे या नियुक्तीचे स्वागत आणि अभिनंदन केले आहे. गेल्या महिन्यात केपटाऊन येथे झालेल्या CPA आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले होते.
CPA ही राष्ट्रकुल देशांमधील संसद, विधिमंडळांमध्ये सहकार्य, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि सुशासनाला प्रोत्साहन देणारी महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संस्था आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना भारताचे प्रतिनिधी म्हणून मिळालेली ही संधी, महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेचा गौरव आहे. CPA ची महाराष्ट्र शाखा ही देशातील सर्वप्रथम स्थापित शाखा आहे.
या नियुक्तीमुळे महाराष्ट्र विधिमंडळाला राष्ट्रकुलातील विविध देशांच्या प्रतिनिधीगृहांशी संवाद, संसदीय कामकाजातील उत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि लोकशाही संस्था अधिक सक्षम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान देण्याची संधी मिळणार आहे.
*०५ नोव्हेंबर रोजी कार्यकारी समितीची महत्त्वाची बैठक*
CPA कार्यकारी समितीतील विभागीय प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसाठी गुरुवार, दि. ०५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ०८.०० वाजता (GMT) परिचयात्मक बैठक (Orientation Meeting) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कार्यकारी समिती सदस्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि संस्थेची प्रशासकीय कार्यचौकट (Governance Framework) याबाबत मार्गदर्शन होणार असून, २०२७ च्या मध्य-वर्षीय बैठकीच्या (Mid-Year Meeting) पूर्वतयारीच्या दृष्टीनेही ती महत्त्वाची आहे.
—






















