*मुंबईतील कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे (GVP’s) निष्कासित करण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात : अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा*
*• सुका कचरा वर्गीकरण केंद्रांचे आधुनिकीकरण, बांधकाम व पाडकाम राडारोड्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना*
कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रभावी यंत्रणा विकसित केली आहे. प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर या यंत्रणेचा तितक्याच प्रभावीपणे वापर करावा. कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे (Garbage Vulnerable Points – GVP’s) निष्कासित करण्यासाठी प्रयत्न करावेत, बांधकाम व पाडकाम राडारोड्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक प्रभावी उपाययोजना कराव्यात कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. तसेच, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबईतील स्वच्छतेच्या बाबतीत दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी संपूर्ण प्रशासन कटिबद्ध आहे. या निर्देशांनुसार स्वच्छतेबाबत लवकरात लवकर दृश्य स्वरुपात बदल दिसायला हवे अशा उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज (दिनांक २३ ऑक्टोबर २०२६) वरळी येथील महानगरपालिकेच्या कमांड सेंटर येथे पार पडली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनात, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत मुंबईतील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा घेऊन संबंधित कामांना गती देण्याबाबत निर्देश आज देण्यात आले.
मुंबईतील स्वच्छता व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी संबंधित विभागांनी कामांचे नियमित निरीक्षण करावे, प्रलंबित उपाययोजनांचा आढावा घ्यावा आणि निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ. विपिन शर्मा यांनी या बैठकीत दिल्या.
*कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे हटविण्यावर भर द्यावा*
मुंबईतील कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे (GVP’s) ओळखून त्यांचे नकाशांकन (Mapping) करणे, त्यावर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे नियमित देखरेख ठेवणे आणि संबंधित प्रशासकीय विभागांनी (वॉर्ड) कचरा साचण्याच्या कारणांचे विश्लेषण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. पहिल्या टप्प्यात मुंबईत एकूण २८६ कचरा साचण्याची संभाव्य ठिकाणे शोधण्यात आली आहेत. त्यापैकी १०२ ठिकाणे निष्कासित करण्यात आली आहेत. तथापि, कचरा साचण्याची ठिकाणे पुन्हा निर्माण होऊ नयेत, यासाठी वारंवार नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.
*सुका कचरा वर्गीकरण केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे*
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५५ सुका कचरा वर्गीकरण केंद्रांपैकी (Dry Waste Segregation Centres) ४६ केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांत दररोज सुमारे १३७.३२ मेट्रिक टन सुका कचरा संकलित होतो. सुका कचरा संकलन, वर्गीकरण व पुनर्चक्रण प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यावर भर द्यावा. केंद्रांतील उपलब्ध सुविधा, कचरा हाताळणीची व्यवस्था आणि कचरा नोंदींची अचूकता यांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.
*बांधकाम व पाडकाम राडारोड्याच्या (C&D Waste) व्यवस्थापनात काटेकोरपणा आणावा*
मुंबईत दररोज ८,५०० मेट्रिक टनांपेक्षा अधिक बांधकाम व पाडकाम राडारोडा (C&D Waste) निर्माण होतो. या राडारोड्याच्या प्रक्रियेसाठी सध्या दोन प्रकल्पांमधून एकूण १,२०० मेट्रिक टन प्रतिदिन इतकी क्षमता उपलब्ध आहे. बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याचे उगमस्थळी वर्गीकरण, अधिकृत पद्धतीने वाहतूक आणि योग्य प्रक्रिया सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. राडारोडा वाहतुकीवर डिजिटल प्रणालीद्वारे देखरेख ठेवणे, संबंधित प्रकल्पस्थळांची नोंदणी व आवश्यक नियमपालन सुनिश्चित करणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी, असे डॉ. विपिन शर्मा सांगितले.
*सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सुविधांमध्ये प्रभावीपणे सुधारणा करा*
महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत व नळजोडणी, आवश्यक दुरुस्ती आणि नागरिकांसाठी मूलभूत सुविधांची उपलब्धता याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहांची तपासणी करुन आवश्यक दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी पाठपुरावा करावा. तसेच, नवीन व आधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या प्रस्तावित कामांचा नियोजनबद्ध आढावा घ्यावा, असेही विपिन शर्मा म्हणाले.
*****






















