Home मुंबई *धाराशिवचे पालक सचिव डॉ. राजेश देशमुख थेट शेतकऱ्यांच्या बांधावर;पीक नुकसानीची पाहणी करुन...

*धाराशिवचे पालक सचिव डॉ. राजेश देशमुख थेट शेतकऱ्यांच्या बांधावर;पीक नुकसानीची पाहणी करुन जिल्ह्यातील पशुपालकांशी साधला संवाद*

33
0

*धाराशिवचे पालक सचिव डॉ. राजेश देशमुख थेट शेतकऱ्यांच्या बांधावर;पीक नुकसानीची पाहणी करुन जिल्ह्यातील पशुपालकांशी साधला संवाद*

*दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी गावनिहाय ‘मायक्रो प्लॅन’(सूक्ष्म आराखडा) करा;प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करा*

*जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापनार;जलसंधारण कामासाठी ‘पाणी फौंडेशन’चे सहकार्य*

धाराशिव, दि. १९ ऑक्टोबर – जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि चारा टंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन केवळ कागदोपत्री आराखडे न करता प्रत्येक टंचाईग्रस्त गावासाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडा (मायक्रो प्लॅन) तयार करावा. उपलब्ध जलसाठ्यांचे काटेकोर संरक्षण करून नियोजित उपाययोजनांची प्रत्यक्ष क्षेत्रावर प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

दरम्यान संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांना आधार देत त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही राजेश देशमुख यांनी दिल्या.

धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजनांबाबत निर्देश दिले.

बसवंतवाडी येथील शेतकरी देवानंद शिंदे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची डॉ. राजेश देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पेरणीची वेळ, पावसाचा खंड, मागील वर्षीचे उत्पादन, कापणीची पद्धत आणि उत्पादन खर्च याबाबत शिंदे यांच्याशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली.

दुष्काळाचा फटका केवळ पिकांनाच नव्हे, तर पशुधनालाही बसत असल्याने डॉ. राजेश देशमुख यांनी देवसिंग (तुळ) येथील दूध उत्पादक शेतकरी नेताजी जाधव यांच्यासह जिल्ह्यातील पशुपालकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यात सध्या दीड हजार एकर क्षेत्रावर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबत प्रत्येक तालुक्यात उपलब्ध क्षेत्र आणि पाण्याचा विचार करून मोठ्या प्रमाणावर चारा लागवडीचे नियोजन करण्याचे निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले. कमी कालावधीत तयार होणाऱ्या चारा पिकांना प्राधान्य देऊन पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करण्यावर भर द्यावा, असेही सांगितले.

आढावा बैठकीत डॉ. राजेश देशमुख यांनी पाणीटंचाई, चारा टंचाई, पीक नुकसान, पीकविमा, रब्बी हंगाम, रोजगार आणि आरोग्य सुविधांचा एकत्रित आढावा घेतला. आगामी महिन्यांत कोणत्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते, कुठे टँकरची आवश्यकता भासू शकते आणि कोणते पर्यायी पाणीस्रोत उपलब्ध आहेत, याचा आतापासूनच अभ्यास करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक टंचाईग्रस्त गावाचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करून त्यातील उपाययोजनांची प्रत्यक्ष पडताळणी करावी. यासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घ्यावी. तसेच जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही दिल्या .

उपलब्ध पाणीसाठ्यांचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच त्यांचे संरक्षण करण्यावर प्रशासनाने भर द्यावा. धाराशिव शहराला उजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील गळती तातडीने दुरुस्त करावी. आरओ प्रकल्पांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या पुनर्वापराच्या शक्यता तपासाव्यात. प्राथमिक आरोग्य केंद्रांना पाणीपुरवठ्यात प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही डॉ. देशमुख यांनी केल्या. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन साठवण तलावांमधील गाळ काढावा आणि तो शेतात टाकण्याचे नियोजन करावे. मनरेगाच्या माध्यमातून दुष्काळी भागात अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यावरही भर द्यावा, असेही सांगितले.

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर होणाऱ्या मदतीचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी सर्व आवश्यक माहिती आणि नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. पीकविम्याच्या बाबतीत विशेष दक्षता घेऊन एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

धाराशिव जिल्ह्यातील पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी प्रसिध्द सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फौंडेशनचे मार्गदर्शन घेण्यासाठी डॉ. देशमुख यांच्या सूचनेनुसार पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी बैठकीत ऑनलाइन सहभाग घेतला. त्यांनी जलसंधारण तसेच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविल्यास धाराशिव जिल्ह्याचे चित्र निश्चितपणे बदलू शकते, असे सांगून डॉ. अविनाश पोळ यांनी गावागावांतील जुन्या जलसंधारण संरचनांची दुरुस्ती आणि सुधारणा करण्यावर भर दिला. अस्तित्वात असलेल्या जलसंधारण साधनांचा अधिकाधिक उपयोग करून पाणी साठवणक्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले.
दुष्काळाचे संकट मोठे असून त्यावर मात करण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणेचे प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत. शासन आणि समाजाने एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न केल्यास दुष्काळाच्या संकटावर प्रभावीपणे मात करता येईल, असेही डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले.

नीती आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ५०० एकर तुती लागवडीचे नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी बैठकीत दिली.

या दौऱ्यात व बैठकीला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here