Home उद्योग / शिक्षण वार्ता *सह्याद्री ते किलिमांजारो : जिद्दीच्या शिखराकडे*

*सह्याद्री ते किलिमांजारो : जिद्दीच्या शिखराकडे*

39
0

*सह्याद्री ते किलिमांजारो : जिद्दीच्या शिखराकडे*

काही प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतात. ते माणसाला स्वतःशी नव्याने भेट घडवतात, आपल्या क्षमतांची ओळख करून देतात आणि मनातील भीतीवर मात करण्याचे बळ देतात. माझ्यासाठी किलिमांजारोचा प्रवास असाच—स्वतःचा शोध घेणारा, आत्मविश्वास वाढवणारा आणि आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला.

२४ जुलै २०२६ रोजी सकाळी आठ वाजता, समुद्रसपाटीपासून ५,८९५ मीटर उंचीवर असलेल्या आफ्रिकेतील सर्वोच्च ‘उहुरू पीक’वर मी उभा राहिलो. त्या क्षणी माझ्या आयुष्यातील एक मोठे स्वप्न साकार झाले. माझ्यासमोर केवळ एक पर्वतशिखर नव्हते; तर अनेक वर्षांची मेहनत, असंख्य डोंगरवाटा, पहाटेच्या धावा, व्यायामशाळेत गाळलेला घाम, मित्रांची साथ आणि कुटुंबाचा विश्वास उभा होता. हा केवळ किलिमांजारो सर केल्याचा आनंद नव्हता; तो स्वतःच्या मर्यादांवर मिळवलेला विजय होता.

माझ्या गिर्यारोहणाच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून झाली. सह्याद्रीने मला पर्वताचा आदर करायला आणि प्रत्येक पाऊल स्वतःच्या सामर्थ्यावर टाकायला शिकवले. पुढे ट्रेकिंगची आवड वाढत गेली. याच ओढीने मला एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत नेले. हिमालयाचे विराट रूप अनुभवताना मनात मोठी स्वप्ने आकार घेऊ लागली. भूतानमधील ट्रेकदरम्यान मनात प्रश्न निर्माण झाला—“आता पुढचे शिखर कोणते?” उत्तर होते—किलिमांजारो!

कुटुंब, नोकरी आणि दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळत या मोहिमेसाठी जवळपास चार महिने कठोर तयारी केली. पहाटे धावणे, आठवड्याच्या शेवटी हायकिंग करणे, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि इन्क्लाइन ट्रेडमिलवर सराव करणे, हा दिनक्रमाचा भाग बनला. या प्रशिक्षणातून शरीरासोबत मनालाही एकच संदेश दिला—“हे कठीण आहे; पण अशक्य नाही!”

सात दिवसांची किलिमांजारो मोहीम आम्ही ‘मचामे रूट’ने पूर्ण केली. दाट जंगल, खडकाळ प्रदेश, बोचरे वारे आणि सातत्याने बदलणाऱ्या हवामानातून वाटचाल करताना स्वाहिली भाषेतील ‘पोले पोले’ हा शब्द आमचा मूलमंत्र ठरला. त्याचा अर्थ—हळूहळू. पर्वतावर वेगापेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचे असते, याची जाणीव या प्रवासाने करून दिली.

उंची वाढत गेली, तसतसा शरीरावरील ताण वाढू लागला. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रत्येक पाऊल जड वाटत होते. शरीर थांबायला सांगत होते; पण मन म्हणत होते—“आणखी एक पाऊल!” अशाच असंख्य छोट्या पावलांनी मी शिखर गाठले. मोठी उद्दिष्टे एका मोठ्या झेपेने नव्हे, तर छोट्या-छोट्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य होतात, हा धडा किलिमांजारोने दिला.

शिखरावरील सूर्योदय, अथांग आकाश, गोठवणारी थंडी आणि मनात दाटलेली शांतता—तो अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता. त्या क्षणी सह्याद्रीच्या वाटा, एव्हरेस्ट बेस कॅम्प, कठोर प्रशिक्षण, मित्रांची साथ आणि कुटुंबाचे प्रोत्साहन डोळ्यांसमोर तरळून गेले. कोणतेही मोठे शिखर एकट्याने गाठता येत नाही. सहप्रवासी मित्र, ट्रेक लीडर्स, स्थानिक गाईड्स आणि संपूर्ण सहायक पथकामुळे हा प्रवास यशस्वी झाला.

माझ्या प्रत्येक पावलामागे कुटुंबाचा विश्वास होता. विशेषतः पत्नीला दिलेले—“मी हे करून दाखवणार!”—हे वचन सतत प्रेरणा देत राहिले. महापारेषणमधील जबाबदारीच्या नोकरीने मला शिस्त व जबाबदारी शिकवली; कुटुंबाने स्थैर्य दिले; मित्रांनी ऊर्जा दिली आणि पर्वतांनी स्वतःला ओळखायला शिकवले.

किलिमांजारोचे शिखर गाठले असले, तरी प्रवास संपलेला नाही. कारण प्रत्येक शिखर हा शेवट नसतो; ती पुढच्या स्वप्नाची सुरुवात असते. आता मनात पुन्हा तोच प्रश्न आहे—“पुढचे शिखर कोणते?”

कारण शिखर गाठणे म्हणजे केवळ यश मिळवणे नव्हे; तर स्वतःवरील विश्वास अधिक दृढ करणे होय!

-विनय खेडेकर
अतिरिक्त कार्यकारी अभियंता
राज्य पारेषण उपक्रम, महापारेषण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here