Home पुणे महापुरुषांचे विचार कृतीत आणा; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा : डॉ. नीलम...

महापुरुषांचे विचार कृतीत आणा; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा : डॉ. नीलम गोऱ्हे

35
0

महापुरुषांचे विचार कृतीत आणा; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा : डॉ. नीलम गोऱ्हे

लोककल्याणाची वारी पुढे नेण्यासाठी महापुरुषांच्या अनुयायांनी एकत्र यावे : डॉ. श्रीपाल सबनीस

डॉ. नीलम गोऱ्हे आणि ॲड. प्रमोद आडकर यांचा ‘क्रांतिज्योती स्मृती पुरस्कार’ देऊन गौरव

पुणे, दि. १२ ऑक्टोबर २०२६ : महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणून समाजातील शोषित, पीडित आणि संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबरोबरच मानसिक आधार देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा. अडचणीत असलेल्या व्यक्तीशी केलेला एखादा फोन, संदेश किंवा संवेदनशील संवादही तिला धीर देऊ शकतो, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचतर्फे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती व चवदार तळे सत्याग्रह स्मृतिशताब्दी उपक्रमांतर्गत आयोजित सोहळ्यात डॉ. नीलम गोऱ्हे आणि रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांना ‘क्रांतिज्योती स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. शाल आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

नाना पेठेतील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलच्या ‘अहिल्याश्रम’ या ऐतिहासिक वास्तूत कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी विशाल शेवाळे होते. कार्यक्रमाला उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रमुख व्याख्याते किरण सोनावणे, प्राचार्य अनिल बोरणारे, संयोजक विठ्ठल गायकवाड आणि लता राजगुरू यांच्यासह मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, परिवर्तनाच्या चळवळीत महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मोलाचे आहे. या महापुरुषांच्या लोककल्याणाची वारी पुढे नेण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी एकत्र आले पाहिजे. समाजाची संस्कृती सत्यावर अवलंबून असते. संतांनी आणि महापुरुषांनी समाजाला सत्याची शिकवण दिली असून भविष्यातही सत्याची ही पूजा सुरू राहिली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महापुरुषांच्या कार्याशी नाते असलेल्या अहिल्याश्रम या वास्तूत आपला गौरव होत असल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी आनंद व्यक्त केला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण व समतेसाठी संघर्ष केला. त्यांच्या कार्यातून प्रत्येकाच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची प्रेरणा मिळते. सार्वजनिक जीवनात शेतकरी, महिला, विद्यार्थी किंवा अन्य कोणत्याही घटकाचा प्रश्न मांडला जात असताना तो गांभीर्याने ऐकण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

नुकत्याच केलेल्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यातील अनुभव सांगताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, ग्रामीण भागात पाणीटंचाईसह गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाच्या मदतीबरोबरच माणसांनी एकमेकांना दिलेला आधारही महत्त्वाचा आहे. दुष्काळग्रस्त भागात नातेवाईक किंवा परिचित असलेल्या नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क ठेवावा, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि शक्य ती मदत करावी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्याशी सातत्याने संवाद साधून त्यांना धीर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. चवदार तळे सत्याग्रहाने पाण्याच्या समान हक्काचा आणि मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न पुढे आणला. या विचारांचे स्मरण करताना आज पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांकडेही संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

महिला सुरक्षेबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी अंधश्रद्धा, स्त्री-पुरुष असमानता आणि व्यसनाधीनतेमुळे कुटुंबांवर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून होणारी फसवणूक, शोषण आणि हिंसा याबाबत तरुणांनी जागरूक राहावे. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करता दोघांनाही सन्मानाने वागविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रेम आणि सहजीवनात दुसऱ्या व्यक्तीच्या इच्छेचा व स्वातंत्र्याचा आदर असला पाहिजे. नकार स्वीकारण्याची वृत्ती तरुणांनी विकसित केली पाहिजे. स्वतःचे किंवा दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे वर्तन स्वीकारता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गरिबांच्या पुनर्वसनाचा विचार करताना त्यांच्या उपजीविकेची साधने आणि दैनंदिन गरजा लक्षात घ्याव्यात, तसेच सामाजिक चळवळींशी जोडलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ॲड. प्रमोद आडकर यांनी संस्थेशी असलेल्या कौटुंबिक संबंधांना उजाळा देत पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शोषित आणि पीडितांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहिले जावे, अशी अपेक्षा परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केली. महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी प्रास्ताविकात सांगितले.

फोटो ओळ : क्रांतिज्योती स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित मान्यवर. डावीकडून विशाल शेवाळे, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. श्रीपाल सबनीस, ॲड. प्रमोद आडकर, लता राजगुरू, परशुराम वाडेकर आणि विठ्ठल गायकवाड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here