*मुंबईकर नागरिकांना पाणी बचतीसाठी नम्र आवाहन*
‘एल निनो’आणि ‘हिंदी महासागर द्विध्रुव’(इंडियन ओशन डायपोल — आयओडी) यांसारख्या हवामानविषयक घटकांच्या प्रभावामुळे सन २०२६ मध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात धरणांतील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱया धरणांमधील उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकवून ठेवणे आवश्यक आहे. पाण्याची वाढती मागणी, ‘एल निनो’मुळे संभाव्य तापमानवाढ आणि धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. या प्रयत्नांना मुंबईकर नागरिकांचे सहकार्य मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांची आपल्या दैनंदिन जीवनात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे नम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
घरातील नळ विनाकारण सुरू ठेवू नयेत, नळ किंवा जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी, वाहनांची व परिसराची स्वच्छता करताना पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, तसेच शक्य तेथे पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा. गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना, शैक्षणिक संस्था आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही पाणी बचतीच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. प्रत्येक नागरिकाने पाण्याचा जपून वापर केल्यास उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होईल. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून, आज केलेली पाणी बचत ही उद्याच्या सुरक्षित जलभविष्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ हा संदेश केवळ घोषवाक्यापुरता मर्यादित न ठेवता, तो प्रत्येकाने आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणावा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी बचतीच्या प्रयत्नांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यासमवेतच, दुय्यम वापरांसाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच पर्यायी जलस्रोतांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पाण्याची बचत ही केवळ राज्य शासन किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नसून, ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने दररोज थोडेसे पाणी वाचवले, तरी संपूर्ण महानगराच्या पाणी बचतीमध्ये मोठे योगदान मिळू शकते. पाण्याचा अपव्यय टाळणे, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पाणी बचतीसाठी इतरांनाही प्रोत्साहित करणे, या छोट्या-छोट्या कृतींमधून आपण मोठा बदल घडवू शकतो. म्हणूनच, सर्व मुंबईकर नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणी बचतीचा संकल्प करावा, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांना दररोज सुमारे ४ हजार ६६४ दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, उपलब्ध जलस्रोतांमधून सरासरी ४ हजार १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने राज्य शासनाच्याच जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार दिनांक १५ मे २०२६ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. ही कपात सध्या सुरू असून, उपलब्ध धरणांमधील पाणीसाठा अधिकाधिक दिवस टिकवून ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार, भविष्यातील पेयजलाची गरज लक्षात घेऊन दिनांक ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार पाणी बचतीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विविध अतिरिक्त सूचना जारी केल्या आहेत.
*पाणी बचतीसाठी महत्त्वाच्या सूचना*
· नागरिक, औद्योगिक व व्यापारी आस्थापना तसेच विविध संस्थांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यवय टाळावा.
· जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये.
· पिण्याच्या पाण्याच्या वापरा व्यतिरिक्त इतर वापरासाठी विहरी, कूपनलिका, विंधन विहरी यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
· औद्योगिक व व्यापारी आस्थापना आणि स्पोर्ट्स क्लबना होणाऱया पाणीपुरवठ्यातील २० टक्के कपात सुरू राहणार.
· उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रणासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनेंतर्गत रस्ते धुण्याची कायर्वाही केली जाते. हे रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधील प्रक्रियायुक्त शुद्ध पाणी किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा.
· बांधकामाच्या ठिकाणी पिण्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधील प्रक्रियायुक्त शुद्ध पाणी किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा.
· वाहने धुणे, उद्यानांमधील झाडांना पाणी घालणे आणि रस्ते अथवा परिसर स्वच्छ करण्यासाठी विहिरी, कूपनलिका व बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा.
· सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि प्रसाधनगृहांचे व्यवस्थापन करणाऱया संस्थांनीही शक्य तितक्या प्रमाणात पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा.
*पाणीगळती रोखण्यासाठी विशेष पथके*
· पाणीगळतीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जल अभियंता विभागामार्फत विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. पाणीगळती रोखण्यास प्राधान्य देत पाणी गळतीची प्रकरणे कालबद्ध पद्धतीने हाताळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
*पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाई*
· मुंबईतील उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करून पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिकांनी आणि सर्व संबंधित आस्थापनांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
· बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱया पिण्याच्या पाण्याचा कोणत्याही ठिकाणी / कोणत्यांही प्रकारे गैरवापर आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात येत आहे.
***






















