*बॉयलर क्षेत्रातील तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि सुरक्षिततेला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर*
*मुंबई, दि. ८:* बॉयलर उद्योगातील सुरक्षितता, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योगस्नेही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, ‘बॉयलर इंडिया २०२६’च्या माध्यमातून या क्षेत्रातील उत्पादक, उद्योजक, तज्ज्ञ, अभियंते, ऑपरेटर आणि ग्राहकांना एकत्र आणून तंत्रज्ञान व ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना देण्यात येत असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.
वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात कामगार विभाग बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘बॉयलर इंडिया २०२६’ कार्यशाळा, चर्चासत्र व प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय.ए. कुंदन, विकास आयुक्त सुशिल खोडवेकर, केंद्रीय बाष्पके मंडळाचे सचिव संदीप कुंभार, बाष्पके संचालनालयाचे संचालक संदीप चिवटे आदी उपस्थित होते.
*मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले -*
> “ऊर्जा, साखर, वस्त्रोद्योग, रसायन, पेट्रोकेमिकल्स, अन्नप्रक्रिया, औषध, कागद, रिफायनरीज अशा सर्व उद्योगांमध्ये बॉयलर हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे बॉयलरची सुरक्षितता ही थेट कामगारांच्या सुरक्षिततेशी आणि देशाच्या औद्योगिक स्पर्धात्मकतेशी जोडलेली आहे.”
> “ई-गव्हर्नन्समध्ये बॉयलर संचालनालयाने राज्यात ६८ विभागात चौथा क्रमांक मिळवला – याबद्दल अभिनंदन. आता AI च्या माध्यमातून बिघाड झाल्यावर सूचना देण्यापेक्षा, बिघाड होण्याआधीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाय करता येतील का यावर विचार व्हावा.”
> “नागपूर येथे बॉयलर कौशल्य, वेल्डिंग, तपासणी आणि औद्योगिक सुरक्षिततेसाठी उत्कृष्टता केंद्र सुरू करत आहोत – यातून युवकांना रोजगार आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळेल.”
*वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले -* बॉयलर निर्मितीपासून तपासणीपर्यंत ‘सेफ्टी फर्स्ट’ आवश्यक आहे. या प्रदर्शनामुळे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना एकाच व्यासपीठावर व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील.
यंदाच्या ‘बॉयलर इंडिया’चे चौथे आयोजन असून देश-विदेशातील *२४६ प्रदर्शकांनी* सहभाग घेतला आहे. कार्यक्रमात बॉयलर तंत्रज्ञानावरील लघुचित्रपट दाखवण्यात आला व पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
*






















