अन्नधान्यांचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता – अनिल देशमुख
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन उपाययोजना करण्याची मागणी
मुंबई, प्रतिनीधी
संपूर्ण महाराष्ट्रात यंदा पडलेल्या भीषण कोरड्या दुष्काळामुळे राज्यातील खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हातचे पीक वाया गेल्याने ग्रामीण भाग आर्थिक संकटात सापडला असून, नजीकच्या भविष्यात राज्यात अन्नधान्य, कडधान्य व तेलबियांचा भीषण तुटवडा निर्माण होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने नियोजन करण्याची आणि सर्वसमावेशक दुष्काळ निवारण आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात पावसाच्या अभावामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि मका यांच्या उत्पादनात ५५% ते ६०% घट झाली आहे. तसेच सोयाबीन आणि भुईमुगाचे उत्पादन सुमारे ६५% ने घसरले आहे. पावसाअभावी कोकण आणि पूर्व विदर्भातील सुमारे ८ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील भातशेती बाधित झाली आहे. कडधान्यांमध्ये तूर, मूग आणि उडदाच्या उत्पादनात ६५% पेक्षा मोठी घट नोंदवली गेली आहे. राज्यातील विहिरी कोरड्या ठाक पडल्या असून बोअरवेल आटल्या आहेत. तलावांमध्ये पाणी नसल्याने पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणेही कठीण झाले आहे, ज्यामुळे शेतीला पाणी मिळणे अशक्य झाले आहे. या बिकट परिस्थितीमुळे यंदा रब्बी हंगामातील गहू, हरभरा व पालेभाज्यांचे पेरणी क्षेत्र ७०% ने खाली येण्याचा अंदाज आहे. तसेच उसाचे उत्पादन सुमारे ३५% ने घटण्याची शक्यता असल्याने राज्यातील साखर कारखानदारी आणि साखरेच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होणार असल्याचेही अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.
अन्नधान्याचा पुरवठा खंडित झाल्यास बाजारपेठेत महागाई प्रचंड वाढून सामान्य जनतेला अन्नाच्या टंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी शासनाकडे काही मुख्य मागण्या मांडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या तृणधान्य व कडधान्यांच्या साठ्याचा तातडीने आढावा घेऊन सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशनिंग) मजबूत करण्यात यावी. तुटवड्याचा गैरफायदा घेऊन व्यापाऱ्यांकडून होणारी कृत्रिम साठेबाजी रोखण्यासाठी कडक कायदेशीर पावले उचलावीत. महाराष्ट्राला या संभाव्य अन्नधान्य संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर सर्वसमावेशक दुष्काळ निवारण आराखडा तयार करावा. राज्यातील या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन जनतेला व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही विनंती अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना या पत्राद्वारे केली आहे.
Home मुंबई अन्नधान्यांचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता – अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन...






















