Home मुंबई *जाती-पातीच्या भिंती दूर करत विद्यार्थ्यांसाठी उभारणार एकत्रित हॉस्टेल – महसूल मंत्री चंद्रशेखर...

*जाती-पातीच्या भिंती दूर करत विद्यार्थ्यांसाठी उभारणार एकत्रित हॉस्टेल – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे*

68
0

*जाती-पातीच्या भिंती दूर करत विद्यार्थ्यांसाठी उभारणार एकत्रित हॉस्टेल – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे*

*विभागीय स्तरावर १ हजार, जिल्हा स्तरावर ५०० विद्यार्थ्यांची क्षमता – १३ ऑक्टोबरपर्यंत जागा निश्चित करून प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश*

*मुंबई, दि. ८ ऑक्टोबर २०२६ – प्रतिनिधी -*

जाती-पातीच्या भिंती दूर करून सर्व समाजातील विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्यभरात *एकत्रित विद्यार्थी वसतिगृहे* उभारण्यात येणार असून त्यासाठी योग्य जागा निश्चित करून १३ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असे निर्देश महसूल मंत्री *चंद्रशेखर बावनकुळे* यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

विभागीय स्तरावर एक हजार, तर जिल्हा स्तरावर ५०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.

*बैठकीतील महत्वाचे मुद्दे -*

*१. संकल्पना – एकत्रित हॉस्टेल -* इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतच्या बैठकीत आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, मराठा तसेच सर्व समाजातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृहांऐवजी भविष्यात एकाच ठिकाणी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेवर चर्चा झाली.

*२. जागा निवडीचे निकष -* विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जागेची निवड करावी. शिक्षणासाठी ये-जा करणे सोपे व्हावे, सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असावी तसेच आरोग्य सुविधा, बाजारपेठ आणि इतर दैनंदिन गरजा सहज उपलब्ध होतील, अशा ठिकाणी जागा असावी. भविष्यातील विस्ताराची शक्यताही लक्षात घ्यावी.

*३. सामाजिक समरसतेचा उद्देश -* राज्यात यापूर्वी विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची व्यवस्था आहे. मात्र, पुढील काळात उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये सर्व समाजातील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे निवासाची सुविधा देण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळण्याबरोबरच त्यांच्यात परस्पर संवाद, सलोखा आणि सामाजिक समरसता वाढण्यासही यामुळे मदत होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

*४. महाज्योतीच्या हॉस्टेलसाठी -* महाज्योतीमार्फत वसतिगृहांसाठी मागणी करण्यात आलेल्या जागांबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी. *चंद्रपूर, बीड, परभणी, धाराशिव, नांदेड, सांगली, सोलापूर, अकोला, यवतमाळ, गोंदिया आणि वाशिम* या जिल्ह्यांतील जागांबाबत आवश्यक कार्यवाही करून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास सांगण्यात आले.

महाज्योतीच्या वसतिगृहांसाठी किमान १ हजार विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वसतिगृह उभारता येईल, अशा स्वरूपाचे प्रस्ताव तयार करावेत. उपलब्ध जागेचे क्षेत्रफळ, स्थान, दळणवळणाची सुविधा, परिसरातील शैक्षणिक व नागरी सुविधा आणि भविष्यातील विस्ताराची शक्यता यांचा विचार करून प्रस्ताव सादर करावेत.

काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर निर्णय झालेला असतानाही संबंधित जागांचे प्रॉपर्टी कार्ड पूर्ण झालेले नसल्याने पुढील कार्यवाही प्रलंबित आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रॉपर्टी कार्डची कार्यवाही पूर्ण करून आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत.

*५. विद्यार्थ्यांच्या सोयीला प्राधान्य -* “आपणही विद्यार्थी होतो. त्या काळातील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन या जागांकडे पाहा. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी विशेष लक्ष द्या,” असे सांगत बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या कामात संवेदनशीलतेने लक्ष घालण्याचे आवाहन केले. जागा निश्चिती आणि प्रस्ताव सादर करण्यात दिरंगाई किंवा हयगय खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार संजय बनसोडे, महसूल विभागाचे सहसचिव सं. द. सूर्यवंशी, सहसचिव मनीषा जायभाये, उपसचिव गौरी म्हस्के, उपसचिव भगवान सावंत, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या सहसंचालक स्नेहा देवकाते उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

—

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here