Home मुंबई *विश्लेषण:सौर उर्जेवर कोण आता सर्वसामान्य ग्राहकांच्या खिसे कापणार?

*विश्लेषण:सौर उर्जेवर कोण आता सर्वसामान्य ग्राहकांच्या खिसे कापणार?

41
0

*विश्लेषण:सौर उर्जेवर कोण आता सर्वसामान्य ग्राहकांच्या खिसे कापणार?

*मुंबई, दि. ६ ऑक्टोबर:* छतावर सोलर लावून वीजबिल शून्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) सौर रुफटॉपच्या नेट मीटरिंग नियमांचा नवा मसुदा काढला आहे आणि यात ३ किलोवॅटची नवी लक्ष्मणरेषा काढण्यात आली आहे.

*नेमका बदल काय?*

आतापर्यंत तुमच्या सोलरमधून तयार झालेली जास्तीची वीज वर्षभर तुमच्या खात्यात जमा राहायची. पावसाळ्यात कमी वीज तयार झाली तरी उन्हाळ्यातील शिल्लक वापरता यायची.

*नव्या मसुद्यानुसार:*
१) *३ kW पर्यंत:* तुमच्यासाठी अजूनही वार्षिक हिशेब! वर्षअखेर उरलेली वीज वितरण कंपनी बाजारभावाने विकत घेईल.
२) *३ kW पेक्षा जास्त:* इथेच खरा फटका आहे. तुमचा हिशेब आता *दर महिन्याला* होणार! महिना संपला की तुमची शिल्लक वीज *व्यपगत (Lapse)* होणार. ती पुढच्या महिन्यात नेता येणार नाही आणि त्याचे पैसेही मिळणार नाहीत.

म्हणजे दिवसा नोकरीला जाणाऱ्या आणि संध्याकाळीच वीज वापरणाऱ्या कुटुंबाला दिवसा तयार झालेली वीज वाया जाण्याची भीती आहे.

*इतर महत्त्वाचे मुद्दे:*

– *नवे शुल्क:* १० kW वरील ग्राहकांना ‘साठवणूक शुल्क’ (Storage Charges) भरावे लागणार – म्हणजे तुम्हीच तयार केलेली वीज तुम्हीच नंतर वापरली तर त्याचे भाडे!
– *बॅटरी सक्ती:* १०० kW पेक्षा मोठ्या नव्या प्रकल्पांना ५०% क्षमतेची २ तास किंवा २५% क्षमतेची ४ तास बॅटरी लावणे बंधनकारक!
– *सोसायट्यांसाठी अडचण:* गृहनिर्माण संस्थांना एकत्र प्रकल्प करायचा असेल तर तो किमान १०० kW चा असावा लागेल, जे लहान सोसायट्यांना परवडणारे नाही.

*तज्ज्ञ काय म्हणतात?*

वीजतज्ज्ञ सुधीर बुधे आणि अशोक पेंडसे यांच्या मते, यामुळे नवे सोलर लावण्याची इच्छा कमी होईल. जुन्या ग्राहकांचे करार संपेपर्यंत जुने नियम राहतील, पण क्षमता वाढवली तर नवे नियम लागतील.

*तुम्ही काय कराल?*

MERC ने *१२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत* हरकती मागवल्या आहेत. तुमची सोलरची बचत कमी होऊ नये असे वाटत असेल तर तुम्हीही हरकत नोंदवू शकता.

तुम्हाला हा नवीन नियम योग्य वाटतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा!

—
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here