Home मुंबई *दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अटलसेतू मार्गे) एसटी बससेवा उद्यापासून...

*दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अटलसेतू मार्गे) एसटी बससेवा उद्यापासून सुरू* *परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते सेवेला प्रारंभ;*

66
0

*दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अटलसेतू मार्गे) एसटी बससेवा उद्यापासून सुरू*

*परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते सेवेला प्रारंभ;*

*प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी सुविधा*

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा उद्या, दि. ७ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते या विमानतळ बससेवेचा प्रारंभ होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. विमानतळ उभारणीइतकेच महत्त्वाचे म्हणजे त्याला मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोकण तसेच राज्याच्या विविध भागांशी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जोडणे होय. या पार्श्वभूमीवर एसटीची दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबरोबरच बोरिवली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्वारगेट ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी बससेवा देखील सुरू होत आहे.

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी एसटीची विमानतळ बससेवा महत्त्वपूर्ण ठरेल. विमानतळाला एसटीच्या व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळ्याशी जोडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, विद्यार्थी तसेच विमानप्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह , प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल,” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

एसटीची ‘लालपरी’ आज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. या व्यापक जाळ्याचा उपयोग करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवाशांना सहज आणि सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी एसटी महामंडळाकडून टप्प्याटप्प्याने आवश्यक बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दादर हे मुंबईतील प्रमुख वाहतूक केंद्र असल्याने येथून विमानतळासाठी सुरू होणारी थेट बससेवा प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील विविध भागांतून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा करण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. विमानतळापर्यंतची अखंड आणि सहज सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी ही आधुनिक वाहतूक व्यवस्थेची खरी ओळख आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एसटीचे व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळे यांचा समन्वय महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील महत्त्वाचा दुवा ठरणार असून, प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार विमानतळ बससेवा देण्याचा एसटी महामंडळाचा संकल्प असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here