Home मुंबई *मच्छिमार व कष्टकऱ्यांसाठी मुंबई बँक योजना आणणार* *मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार...

*मच्छिमार व कष्टकऱ्यांसाठी मुंबई बँक योजना आणणार* *मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन*

41
0

*मच्छिमार व कष्टकऱ्यांसाठी मुंबई बँक योजना आणणार*

*मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन*

*अनुशक्तीनगर येथील नवीन शाखेचे आ. तुकाराम कातेंच्या हस्ते उदघाटन*

मुंबई – मच्छिमार बांधव हे मुळ मुंबईकर आहेत. मच्छिमार व कष्टकऱ्यांसाठी आगामी काळात मुंबई बँक योजना आणणार असे, प्रतिपादन मुंबई बँकेचे अध्यक्ष व भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी अनुशक्ती नगर येथील मुंबई बँकेच्या नवीन शाखेच्या उदघाटन प्रसंगी केले. यावेळी चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांच्या शुभहस्ते अनुशक्ती नगर येथील नवीन शाखेचे उदघाटन पार पडले.

याप्रसंगी मुंबई बँकेचे अध्यक्ष व भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, संदीप घनदाट, विठ्ठल भोसले, जिजाबा पवार, अनिल गजरे, विष्णू घुमरे, कविता देशमुख, तेजस्वी घोसाळकर, बँकेचे कार्यकारी संचालक संदीप सुर्वे, बीएआरसीचे पदाधिकारी विवेक डोळस, शिवाजी हनवते, हेमंत कोळी यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, बीएआरसीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ. तुकाराम काते यांनी मुंबई जिल्हा बँकेच्या कार्याचे कौतुक करत चेंबूरच्या घाटले गाव परिसरात कुठेही बँक नसून लोकांना बँकेच्या व्यवहारांसाठी गोवंडी येथे जावे लागत असल्याचे सांगत घाटले गाव येथेही मुंबई बँकेची एक शाखा सुरु करावी अशी विनंती केली. तसेच मुंबई बँकेने महिलांना उद्योग व्यवसायासाठी एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आ. प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बँक नावारूपाला आली असून अनुशक्ती नगर येथे सुरु झालेली बँकेची नवीन शाखा लोकांसाठी उपयोगी ठरणार आहे. सर्वांना बँकेच्या सेवेचा फायदा होईल. ही बँक मराठी माणसांसाठी असून येथील नागरिकांनी बँकेच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आ. काते यांनी केले.

तर अध्यक्षीय भाषणात बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, ट्रॉम्बे परिसरात कष्टकरी सर्वसामान्य वर्ग, निवृत्त लोकं, मच्छिमार राहतात. सर्वसामान्य घटकाला जी मदत करण्याची आवश्यकता आहे ती या शाखेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होणार आहे. या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना अडचणीच्या वेळी सहज व सुलभ व्यवस्था जर केली तर राष्ट्रीय, खासगी बँकांपेक्षा जास्त प्रतिसाद मुंबई जिल्हा बँकेला मिळेल. मुंबईतील सामान्य माणसांवर ज्यावेळी मदतीची वेळ आली त्यावेळी कुठल्याही राष्ट्रीय, खासगी बँका मदतीला आल्या नाहीत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथे येऊन मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा परंतु ज्यावेळी मुंबईकरांना काही द्यायचे असते त्यावेळी सर्वाधिक पुढे मुंबई बँक असते, असेही दरेकर म्हणाले. यावेळी दरेकरांनी मुंबईचे वैभव असलेल्या गिरणी कामगार, माथाडी कामगार, शिक्षक आणि पोलिसांना घरांसाठी कर्ज दिल्याचेही नमूद केले.

आ. दरेकर पुढे म्हणाले कि, सर्वसामान्य माणूस कर्जाचा एक रुपयाही थकवत नाही. विजय मल्ल्यासारखी मोठी लोकं कर्ज थकवतात. त्यांनी एक-पाच हजार कोटी थकवले कि एनपीएची तरतूद करण्यासाठी बजेटमधून पैसे देतात. परंतु सर्वसामान्यांचे २५-५० हजार थकतात त्यावेळी एनपीएची तरतूद नफ्यातून करण्यास सांगतात. हा विपर्यास थांबण्याची गरज असून हा विषय विधिमंडळात सातत्याने मांडत आलो आहे. पुन्हा या विषयावर भविष्यात सहकारात एक चळवळ उभी करू, असा विश्वासही आ. दरेकरांनी व्यक्त केला. त्याचबरोबर मुंबई बँकेने लाडक्या बहिणींना उद्योगासाठी एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले असून दोन ते अडीच हजार महिलांनी याचा लाभ घेतला आहे. ही मुंबई बँकेची देण आहे. हा विचार दुसरी बँक करणार नाही. त्यांना तुमच्या उत्कर्षाशी देणघेणं नसते. त्यांना फक्त व्यवसाय करायचा असतो आणि ठेवी वाढवायच्या असतात. आम्ही सभासद, ग्राहकांच्या विश्वासाच्या ठेवी जमवायचा प्रयत्न करतो, असेही आ. दरेकर म्हणाले.

*आगामी काळात मुंबई बँक २५ हजार कोटींचा टप्पा पार करणार*

आ.दरेकर म्हणाले कि, गेली २५ वर्ष आम्ही संचालक मंडळाने बँकेला तळहाताच्या फोडासारखे जपले. अनेक आरोप, टीका झाल्या. संकटे आली. तरी विचलित न होता बँक मोठी झाली पाहिजे, तीचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे, असा ध्यास घेऊन काम केले म्हणून आज बँकेची उलाढाल १५-१६ हजार कोटींवर गेली आहे. मुंबई बँकेमार्फत स्वयं पुनर्विकास योजना आणली. गृहनिर्माण संस्थांनी स्वतः इमारत उभी करून विकासक देतो त्यापेक्षा जास्त जागा या योजनेद्वारे मिळत आहे. असे धाडसी निर्णय संचालक मंडळ घेतेय त्याचा फायदा कष्टकरी सामान्य माणसाला झाला पाहिजे हा उद्देश आहे. येणाऱ्या काळात बँक झपाट्याने वाढणार असून पुढील पंचवार्षिक संपण्यापूर्वी २५ हजार कोटींचा टप्पा मुंबई बँक पार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही आ. दरेकरांनी व्यक्त केला.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here