Home मुंबई *ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी एक रुपयात जागा* *उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश* *इतर...

*ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी एक रुपयात जागा* *उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश* *इतर समाजाप्रमाणे सर्व सुविधा देण्याच्या सुचना*

47
0

*ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी एक रुपयात जागा*
*उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश*
*इतर समाजाप्रमाणे सर्व सुविधा देण्याच्या सुचना*
*महाज्योतीसाठी ३०० कोटींचा निधी*
*महात्मा फुले त्रिशताब्दी वर्षांनिमित्त उपक्रमांचे आयोजन*

मुंबई, दि. २९ : इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या सर्वांगीण विकासासह विद्यार्थ्याना सुविधा पुरवण्यासाठी महसूलसह सर्व शासकीय विभागांच्या जागा एक रुपये दरात उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

गेल्या बैठकीत चर्चा झालेल्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेताना प्रशासनाची चालढकल खपवून घेतली जाणार नाही. ओबीसींच्या विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

इतर समाजाला ज्याप्रमाणे सुविधा व निधी उपलब्ध करून दिला जातो, त्याच धर्तीवर ओबीसी समाजालाही सर्व सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली.

ओबीसी समाज मंत्रिमंडळ उपसमितीची पाचवी बैठक मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध १२ मुद्दांवर चर्चा झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वनमंत्री गणेश नाईक, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्यासह इमाव विभागाचे उपसचिव, सहसचिव व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, मंत्रीमंडळ उपसमितीच्या प्रत्येक बैठकीत किमान दोन प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले पाहिजेत. त्याबरोबरच परदेशी शिष्यवृत्तीचा प्रस्ताव तातडीने मंजूरीसाठी पाठवावा. ओबीसी समाजातील आत्महत्या केलेल्या १६ नावांसह पुढील समितीत प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवण्यात यावा. महाज्योतीसाठी ३०० कोटींचा निधी, वसतीगृह योजना, वनार्टी यांचे सर्व प्रस्ताव मंजूरीसाठी देण्यात यावेत.
वनमंत्री गणेश नाईक यांनी ओबीसी समाजाचा शासकीय सेवेतील प्रलंबित असणारा संपूर्ण बँकलॉग त्वरित भरून काढण्याची आग्रही मागणी केली. इतर घटकांप्रमाणेच ओबीसी समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर ओबीसी महामंडळालाही सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘क्रांतीज्योती महात्मा फुले समता भवन’ सुरू करण्यात यावे व त्यासाठी २०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करून पुढील बैठकीत सादरीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच महात्मा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ या नाटकाच्या राज्यभरातील प्रयोगांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची सूचनाही भुजबळ यांनी केली.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या संदर्भात बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, महात्मा फुले यांच्यावर समग्र ग्रंथ प्रकाशित करणे, भव्य चित्ररथ तयार करणे, जीवनावर आधारित कॅलेंडर प्रकाशित करणे आणि नागपूर येथे विशेष मॅरेथॉनचे आयोजन करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here