Home मुंबई पुलंचा सांस्कृतिक वारसा जतन होणार; पत्रसंग्रहाचे पुस्तक प्रकाशित होणार

पुलंचा सांस्कृतिक वारसा जतन होणार; पत्रसंग्रहाचे पुस्तक प्रकाशित होणार

44
0

पुलंचा सांस्कृतिक वारसा जतन होणार; पत्रसंग्रहाचे पुस्तक प्रकाशित होणार

*सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने १० लाखांपर्यंत प्रशासकीय मान्यता*

मुंबई, दि. 22 सप्टेंबर – महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकारातून पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित केले जाणार असून, या कामासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.

पु. ल. देशपांडे यांनी साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रातून मराठी मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या पत्रव्यवहारात भारतरत्न लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, पं. रविशंकर, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, जयवंत दळवी, विजय मर्चंट, बाबा आमटे, पांडुरंगशास्त्री आठवले, दया पवार यांसारख्या विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा समावेश आहे.

हा पत्रव्यवहार केवळ वैयक्तिक संवाद नसून त्या काळातील साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

सुनीताबाई देशपांडे यांनी ही मौल्यवान पत्रे जपून ठेवली होती. पु. लं. नी इतरांना लिहिलेल्या पत्रांच्या प्रतीही कुटुंबीयांच्या संग्रहात उपलब्ध आहेत. या ठेव्याचे शास्त्रशुद्ध संपादन करून पुस्तक रूपाने प्रकाशन केले जाणार आहे.

या निर्णयामुळे पुलंच्या साहित्याचा आणि त्यांच्या काळाचा सांस्कृतिक संदर्भ जतन होणार असून संशोधक, साहित्यप्रेमी आणि नव्या पिढीसाठी हा ठेवा उपलब्ध होणार आहे.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here