शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हे
डिजिटल पुरावे सुरक्षित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
पुणे, दि. १८ सप्टेंबर २०२६ : करमाळा तालुक्यातील वरकुटे येथील शुभांगी अभिजीत गरड यांच्या आत्महत्येप्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.
शुभांगी गरड (वय ४०) यांनी दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील चंदननगर परिसरातील राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांचा जुलै २०२५ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर हुंड्याची मागणी, अपमानास्पद वागणूक तसेच शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ व ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींच्या सहभागाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शुभांगी यांचा मोबाइल, व्हॉट्सॲप संदेश, कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि अन्य डिजिटल पुरावे तातडीने सुरक्षित करावेत. कुटुंबीय, नातेवाईक व शेजाऱ्यांचे जबाब नोंदवून हुंड्याच्या मागणीसंदर्भातील आरोपांची चौकशी करावी. लागू होणाऱ्या सर्व कायदेशीर तरतुदींचा समावेश करून पुराव्यांच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई करावी, असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
“विवाहानंतर अवघ्या चौदा महिन्यांत एका विवाहितेला जीवन संपवावे लागणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. या घटनेकडे केवळ कौटुंबिक वाद म्हणून न पाहता सर्व बाजूंनी तपास करून शुभांगी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा,” अशी भूमिका डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. तपास लवकर पूर्ण करून सक्षम पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल करावे आणि कार्यवाहीचा अहवाल सात दिवसांत सादर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.





















