Home मुंबई *कला… संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा हा दीप पुढे नेऊया – सुनेत्रा पवार*

*कला… संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा हा दीप पुढे नेऊया – सुनेत्रा पवार*

94
0

*कला… संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा हा दीप पुढे नेऊया – सुनेत्रा पवार*
*३८ व्या पुणे फेस्टिव्हलचे थाटात उद्घाटन*

पुणे – दि. १८ सप्टेंबर*

*हेडलाईन:* कलेला भाषा-प्रांताच्या सीमा नसतात… कला आणि सामाजिक एकात्मतेचा दीप पुढे नेऊया – खा. सुनेत्रा पवार यांचे आवाहन

*पुणे दि. १८ -* कलेला भाषा, प्रांत यांच्या सीमा नसतात… संस्कृतीला भाषा नसते आणि संगीताला भेद नसतो… चला आपण सर्वजण मिळून कला, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा हा दीप पुढे नेऊया, असे आवाहन खासदार सुनेत्रा पवार यांनी आज पुणे येथे केले.

३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, “पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून हीच भावना जगभर पोहोचू दे. पुण्याची सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध होऊ दे. महाराष्ट्राच्या कला परंपरेचा गौरव अधिक वाढू दे. नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटू दे.”

“आदरणीय दादा दोन वर्षांपूर्वी पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनाला आले होते. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना दादांनी पुण्याच्या विकासाबरोबर पुण्याची सांस्कृतिक ओळख जपण्याला नेहमीच महत्त्व दिले, त्यामुळे हा क्षण माझ्यासाठी भावनिक आहे,” असेही त्यांनी सांगितले.

“पुणे ही केवळ महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी नाही, तर विचार, शिक्षण, साहित्य, संगीत, नाटक, कला-क्रीडा आणि सामाजिक चळवळीची समृद्ध परंपरा जपणारे शहर आहे. त्यामुळे पुण्याच्या भूमीवर होणाऱ्या पुणे फेस्टिव्हलला एक वेगळेच महत्त्व आहे. हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर पुण्याच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि पुणेकरांच्या उत्साहाचा उत्सव आहे,” असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

शासन स्तरावरही कला, साहित्य, संगीत आणि नाट्य या क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. आपल्या राज्याची कला आणि संस्कृती जपताना तिला आधुनिकतेची आणि विकासाची जोड देणे हे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.

कलाक्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही आपली सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

यावेळी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पुणे फेस्टिव्हलच्या चेअरपर्सन मीरा कलमाडी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here