चिमूर – दि. १८ सप्टेंबर*
** कंत्राटातून मलिदा लाटणाऱ्या ‘ठेकेदार आमदाराला’ जनतेच्या समस्यांची काय जाणीव? – विजय वडेट्टीवार यांचा भांगडियांवर घणाघात
गडचिरोली* चिमूरच्या जनाक्रोश मोर्चातून ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह हजारोंचा जनसैलाब, शेतकरी प्रश्नांवर सरकारला घेरले
*चिमूर -* शेतकरी संकटात, तरुण बेरोजगारीच्या खाईत, महागाईने कंबरडे मोडलेले असताना सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा कंत्राटांमध्येच अधिक रस आहे, असा घणाघाती आरोप विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला.
काँग्रेसच्या वतीने आज चिमूर येथे काढण्यात आलेल्या जनाक्रोश महामोर्चात ते बोलत होते. पंचायत समिती जवळून मोर्चाला सुरुवात होऊन तहसील कार्यालयावर सभेत रूपांतर झाले. शेतकरी, शेतमजूर, महिला, युवकांनी ट्रॅक्टर, बैलगाड्या घेऊन मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
वडेट्टीवार म्हणाले, “कंत्राटातून मलिदा लाटणाऱ्या ठेकेदार आमदाराला जनतेच्या समस्यांची काय जाणीव? चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी रस्त्यांची कंत्राटे आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना देऊन त्यांना मालामाल करण्यापलीकडे काहीच केले नाही. मागील १२ वर्षे विधिमंडळात त्यांनी मौनव्रत धारण केले आहे. आम्ही ठेकेदारी नाही तर सेवाधर्म निभावतो.”
“ब्रह्मपुरी क्षेत्रात गेल्या दहा वर्षात गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत ८० टक्के सिंचन व्यवस्था करून जनतेला न्याय देण्याचे काम मी केले,” असेही ते म्हणाले.
यावेळी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, “चिमूरच्या आमदाराने नागपुरात गरीबांच्या हक्काच्या घरावरही कब्जा केला असून त्याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे. जलजीवन मिशनची कामे रेंगाळली आहेत, रस्ते रखडले आहेत.”
या मोर्चात – पीकविमा नुकसानभरपाई, चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करणे, पीककर्ज माफी, सातबारा कोरा करणे, धान बोनस आणि घोषित अनुदानाची तातडीने अंमलबजावणी या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी खा. डॉ. किरसान यांचे चिरंजीव अॅड. दुष्यंत किरसान, विजय गावंडे, प्रा. राम राऊत, जुनेद खान, विजय घरत, गजानन बुटके, धनराज मुंगले व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
*






















