`मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कामाला गती – भाईंदर येथील अत्याधुनिक कास्टिंग यार्डची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून पाहणी |
> *मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कामाला गती – भाईंदर कास्टिंग यार्डची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून पाहणी*
>
> *मुंबई / भाईंदर -* मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्प अंतर्गत वेसावे ते भाईंदर दरम्यान विविध पायाभूत सुविधांची कामे प्रगतिपथावर आहेत. या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी भाईंदर येथे अत्याधुनिक कास्टिंग यार्ड (Casting Yard) उभारण्यात आले आहे.
>
> या कास्टिंग यार्डमध्ये प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या विविध पूर्वनिर्मित काँक्रीट संरचनात्मक घटकांचे (Precast Elements) उत्पादन करण्यात येत आहे.
>
> *अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर* यांनी या कास्टिंग यार्ड प्रकल्प स्थळास प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. प्रीकास्ट घटकांची निर्मिती प्रक्रिया, कामाची प्रगती, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था तसेच आवश्यक यंत्रसामग्री आणि सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
>
> भाईंदर येथील कास्टिंग यार्डमध्ये रस्ते प्रकल्पासाठी आवश्यक घटकांची निर्मिती अत्याधुनिक व नियंत्रित वातावरणात करण्यात येते. यामध्ये साचे तयार करणे, काँक्रीट ओतणे, क्युअरिंग करणे आणि गुणवत्ता तपासणी या प्रक्रिया राबविल्या जातात. येथे तयार होणारे प्रीकास्ट घटक प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी नेऊन नियोजनबद्ध उभारणी केली जाते. यामुळे बांधकामाला गती आणि गुणवत्तेत सातत्य राखणे शक्य होते.
>
> *कामाची गुणवत्ता, अचूक नियोजन आणि सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,* असे श्री. बांगर यांनी अधोरेखित केले. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता तपासणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कामगारांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळाव्यात, अशा सूचना दिल्या.
>
> *पुलाच्या अंमलबजावणीची गती आणि सेगमेंट तयार करण्याची गती तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. सेगमेंट अभावी पुलाचे काम रखडता कामा नये,* असे निर्देशही त्यांनी दिले.
>
> यावेळी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता (किनारा रस्ता – उत्तर) वैभव गांधी यांच्यासह संबंधित अभियंते, सल्लागार उपस्थित होते.
>
> *- MAI MEDIA 24 | मुंबई / भाईंदर प्रतिनिधी*



















