Home मुंबई उद्योग व आस्थापनाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचा रोजगार मेळाव्याला पाठिंबा

उद्योग व आस्थापनाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचा रोजगार मेळाव्याला पाठिंबा

7
0

उद्योग व आस्थापनाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचा रोजगार मेळाव्याला पाठिंबा

*येत्या २९ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’*

– *खाजगी उद्योगांचा रोजगार मेळाव्याला पाठिंबा*

मुंबई, ११ सप्टेंबर : युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे केवळ सरकारचे काम नसून, आपले सामाजिक उत्तरदायित्व आहे. देशात आज शांतता आणि स्थैर्याचे वातावरण आहे त्यामुळे उद्योगधंदे, व्यापार तसेच कुटुंबव्यवस्था सुरळीतपणे सुरू आहे. महाराष्ट्रात बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली, तरी त्याचवेळी रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, अनेकदा नोकरीच्या मुलाखतीला गेल्यानंतर आवश्यक कौशल्ये किंवा आत्मविश्वासाच्या अभावामुळे युवक काही बाबतीत कमी पडतात आणि त्यांना अपेक्षित रोजगार मिळत नाही, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास विभाग आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ‘एम्प्लॉयर राऊंड टेबल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.

मंगल प्रभात लोढा पुढे म्हणाले की, आज प्रत्येक युवकाचे चांगल्या नोकरीचे स्वप्न आहे. विशेषतः कौशल्याधारित क्षेत्रातील रोजगाराच्या संधींकडेही युवकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. परदेशात कौशल्याधारित क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांना चांगले वेतन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील युवकांना कौशल्याधारित आणि चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

महाराष्ट्रातील नामांकित ३२ उद्योग व आस्थापना विभागाच्या मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. येत्या रोजगार मेळाव्याबाबत उद्योग व आस्थापनांच्या काही सूचना, हरकती किंवा अडचणी असल्यास त्यांनी त्या लवकरात लवकर कळवाव्यात. कौशल्य विकास विभागाच्या वतीने उद्योग व आस्थापनांसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित उद्योग व आस्थापनांनी हा अर्ज लवकरात लवकर भरून नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्याही कंपनीला तांत्रिक अडचण किंवा समस्या उद्भवल्यास त्यांनी कौशल्य विकास विभाग अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योग व आस्थापनांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहनही मंत्री लोढा यांनी केले.

आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्याचप्रमाणे राज्याच्या विकासासाठी आपणही आपल्या परीने हातभार लावला पाहिजे, अशी मानसिकता प्रत्येक कंपनीमध्ये असली पाहिजे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न देशासमोर ठेवले आहे. हे स्वप्न आता टप्प्याटप्प्याने साकार होताना दिसत असून, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, असेही लोढा यांनी सांगितले.

कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या रिक्त जागांची माहिती आम्हाला द्यावी. त्यासाठी आवश्यक कौशल्ये असलेले योग्य युवक-युवती आम्ही उपलब्ध करून देऊ. महाराष्ट्रातील युवक-युवती आपलेच आहेत. त्यांना प्रेम, सहकार्य आणि योग्य संधी देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील कंपन्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे. रामराज्य निर्माण करणे आपल्या हातात नसले, तरी त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे नक्कीच आपल्या हातात आहे. आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले, तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाच्या दिशेने निश्चितच एक पाऊल पुढे टाकता येईल, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले.

याप्रसंगी, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त अमित सैनी यांनी पीपीटी सादर करून उद्योग व आस्थापनाच्या मनुष्यबळ व्यवस्थापनांच्या प्रतिनिधींना रोजगार मेळाव्याची इंतभूत माहिती दिली. यावेळी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here