Home मुंबई पुरातत्त्वीय वारसा जपत ओझर तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा : डॉ. नीलम गोऱ्हे

पुरातत्त्वीय वारसा जपत ओझर तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा : डॉ. नीलम गोऱ्हे

32
0

पुरातत्त्वीय वारसा जपत ओझर तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा : डॉ. नीलम गोऱ्हे

श्री विघ्नहराचे दर्शन घेऊन विकासकामांची पाहणी; नौकाविहाराच्या परवानगीबद्दल शासनाचे अभिनंदन

ओझर, दि. ३० : अष्टविनायक दर्शन दौऱ्यादरम्यान शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर गणपतीचे दर्शन घेत मंदिरातील विकासकामांची पाहणी केली.

“पूर्वीच्या तुलनेत मंदिरातील अनेक कामे पूर्ण झालेली दिसत आहेत. मंदिराच्या आतील भागात मार्बलमुळे तापमानात होणारा बदल आणि त्याचा मूर्तीवर होणारा संभाव्य परिणाम याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. आता पुरातत्त्व विभागाच्या सूचनांनुसार काम झाल्याचे दिसत असून ही समाधानाची बाब आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

सुमारे १३ वर्षांपूर्वी मंदिर परिसराचे सुशोभीकरण करून जवळील जलाशयात नौकाविहार सुरू करण्याची भूमिका मांडली होती. राज्य शासनाने आता येडगाव जलाशयात नौकाविहारास परवानगी दिली आहे. यामुळे भाविकांना कुटुंबासह आनंद घेता येईल तसेच पर्यटन आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी ११ ते १३ डिसेंबर २०२१ दरम्यान अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचा दौरा केला होता. त्यानंतर १० जानेवारी २०२२ रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत रस्ते, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, स्वच्छता, दिशादर्शक फलक आणि तलाव परिसराच्या सुशोभीकरणाची कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

“आज काही कामे प्रत्यक्षात पूर्ण झाल्याचे दिसत आहे. मंदिराचे पावित्र्य आणि ऐतिहासिक स्वरूप जपत भाविकांसाठी आधुनिक सुविधा निर्माण करण्याची शासनाची सकारात्मक भूमिका अभिनंदनीय आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट बाळकृष्ण कवडे, शिवसेना सचिव वैभव थोरात, सांगली संपर्कप्रमुख सुनीता मोरे, लातूर संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी, गडचिरोली संपर्कप्रमुख वर्षा मोरे, युवासेना तालुकाप्रमुख विकास राऊत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here