Home संभाजीनगर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे. आई-वडिलांसह १८...

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे. आई-वडिलांसह १८ वर्षांच्या मुलाचा असा दुर्दैवी अंत व्हावा, यापेक्षा मोठे दु:ख ते कोणते? -सचिन देव ,सामाजिक अध्यात्मिक पत्रकार

59
0

 *छत्रपती संभाजीनगर घटना…*

*आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवताना आई वडिलांचाही मृत्यू…..*

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे. आई-वडिलांसह १८ वर्षांच्या मुलाचा असा दुर्दैवी अंत व्हावा, यापेक्षा मोठे दु:ख ते कोणते?

-सचिन देव

या घटनेमागचे खरे कारण तपासानंतर समोर येईलच. घरातील विसंवाद, अपेक्षा पूर्ण न झाल्याची नाराजी किंवा ताणतणाव यापैकी नेमके काय कारण होते, हेही स्पष्ट होईल. पण आता कारण काहीही असो,गेलेले तीन जीव परत येणार नाहीत.

सगळ्यात जास्त मन हेलावून टाकणारी गोष्ट म्हणजे मुलाला वाचवण्यासाठी पुढे गेलेल्या त्या वडिलांची घालमेल…

बाप आपल्या मुलासाठी किती असहाय होऊ शकतो, हे त्या क्षणाने दाखवून दिले.

बाप आयुष्यभर जबाबदाऱ्या पार पाडत असतो. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो, परिस्थितीशी झुंजतो आणि अनेकदा मनातले दुःखही न सांगता गप्प राहतो.बापाचा संघर्ष अनेकदा शब्दांत नसतो… तो त्याच्या शांततेत असतो.

कुणाल, कदाचित तुला त्या क्षणी हे समजले नसेल. तुझ्या मनात काही अपेक्षा असतील, नाराजी असेल. पण अपेक्षा आणि हट्ट यांच्यातील सीमारेषा समजून घेणे गरजेचे होते.

आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला कठीण पेपर येतात. काही प्रश्नांची उत्तरे लगेच सापडत नाहीत. आर्थिक अडचणी येतात, अपयश येते, घरात मतभेद होतात, अपेक्षा पूर्ण होत नाहीत. पण म्हणून काही पेपर फाडून टाकायचा नसतो…

धीर धरायचा असतो, संवाद साधायचा असतो, जवळच्यांची मदत मागायची असते आणि पुन्हा उभे राहायचे असते.
एखादी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आयुष्य संपत नाही. घरच्यांशी मतभेद झाले म्हणून नाती संपत नाहीत.

बोलता येते, रडता येते, राग व्यक्त करता येतो… पण आयुष्य संपवण्याचा निर्णय कधीच घेता कामा नये.

आज अनेक जण म्हणतील , खवड्या डोंगरावर प्रशासनाने जाण्यास बंदी घातली पाहिजे. याआधीही अशा घटना घडल्या आहेत, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना करणे निश्चितच गरजेचे आहे.

पण प्रश्न फक्त डोंगरावर बंदी घालण्याचा नाही… प्रश्न माणूस स्वतःच्या इच्छा, अपेक्षा आणि भावनांचा गुलाम होऊ नये याचा आहे.जेव्हा एखादी इच्छा किंवा अपेक्षा हेच माणसाचे सर्वस्व बनते, तेव्हा क्षणिक भावनेतून घेतलेला निर्णय स्वतःबरोबर आपल्या जवळच्या माणसांचेही आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

मग अशा निर्णयांना आळा कसा बसेल?
कुठल्या शिक्षणाने?
कुठल्या संस्काराने?
कुठल्या श्रेष्ठ आचरणाने?
आणि कुठल्या सामाजिक जाणीवेने?
हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.

मुलांनी आई-वडिलांचा संघर्ष समजून घ्यावा आणि पालकांनीही मुलांच्या मनात काय चालले आहे ते ऐकून घ्यावे. संवाद कधीच थांबू देऊ नये.

मुलांमध्ये स्वकष्टार्जित कमाईवर जगायचे, मेहनत करायची, पडल्यावर पुन्हा उभे राहायचे, ही वृत्ती रुजवणे आज अत्यंत गरजेचे आहे.

कारण आयुष्यात कठीण पेपर यायलाच हवेत. कधी कधी ते स्वतःहून स्वीकारायलाही हवेत. त्यातूनच माणूस घडतो, आत्मविश्वास येतो आणि जगण्याची ताकद निर्माण होते.

कुणाल… आयुष्याचा तो कठीण पेपर तू थोडा धीर धरून सोडवायला हवा होतास.

तू चुकलास…!
पण त्या चुकीची शिक्षा तुझ्याबरोबर तुझ्या आई-वडिलांनाही मिळाली.

ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही; ती पालकांसाठी, मुलांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आहे.

डोंगरावर जाण्यास बंदी घालता येईल…
पण मनातल्या हतबलतेवर बंदी कशी घालणार?
त्यासाठी शिक्षण हवे, संस्कार हवेत,
संवाद हवा…
आणि आयुष्य कितीही कठीण असले,
तरी ते जगण्याची जिद्द हवी. ..

असो, ईश्वर त्या तिन्ही जीवांना शांती देवो.

काहीही झाले तरी बोलत राहूया…कारण आयुष्यापेक्षा मोठी कोणतीही अडचण नसते.

— सचिन देव
सामाजिक अध्यात्मिक पत्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here