*शहरातील समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसची ‘शहर परिवर्तन गट’ मोहिम, सचिन सावंत अध्यक्ष तर संग्राम खोपडे समन्वयक.*
*माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी २० ऑगस्टला राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात उद्घाटन.*
मुंबई, दि. १८ ऑगस्ट २६.
राज्यात शहरीकरण झपाट्याने वाढत आहे पण वाढत्या शहरीकरणासाठी पायाभुत सोयी सुविधा पुरवण्यात सरकार कमी पडत आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे आजही शहरे बकाल बनली आहेत. चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, पार्किंग, प्रदुषण यासह अनेक समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकार व महापालिका प्रशासन शहर विकासाच्या नावाखाली फक्त कोट्यवधी रुपयांचा निधी लाटण्याचे काम करत आहे. शहराच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शहर परिवर्तन गट सुरु केला असून या मोहिमेचे उद्घाटन २० ऑगस्ट रोजी सर्व महानगरपालिका क्षेत्रात होणार आहे.
शहर परिवर्तन गटाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तेलंगणाचे सहप्रभारी व वरिष्ठ प्रवक्ते सचिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर संग्राम खोपडे हे या गटाचे समन्वय आहेत. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन शहर परिवर्तन गटाच्या कार्यक्रमाची रुपरेषा जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.























