Home नागपूर *ओबीसींची संख्या कमी दाखवण्याची फसवणूक खपवून घेणार नाही, ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे...

*ओबीसींची संख्या कमी दाखवण्याची फसवणूक खपवून घेणार नाही, ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार*

10
0

*मंडल यात्रेचा चंद्रपुरात समारोप, ओबीसी जनजागृतीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार*

नागपूर, दि. ९ : ईम्पिरिकल डेटाच्या नावाखाली ओबीसींची वास्तविक संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात आहे. ओबीसींची लोकसंख्या सुमारे ६० टक्के असताना ती २८ ते ३० टक्के असल्याचे दाखवणे खपवून घेतले जाणार नाही. ओबीसींना न्याय आणि त्यांचे घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धार काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ओबीसी जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या मंडल यात्रेचा आज चंद्रपूर येथे समारोप होत असून, या यात्रेने विदर्भातील गडचिरोली, बल्लारशा, वडसा आणि देसाईगंजसह विविध भागांत ओबीसी हक्कांबाबत जनजागृती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर सरकार बोलत नाही. त्यामुळे आम्ही मंडल यात्रेतून एल्गार पुकारला आहे. आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सकल ओबीसी समाजाची संघटना उभी करत आहोत. सरकारच्या भरोशावर ओबीसींची लढाई होणार नाही, हे आम्ही गृहीत धरले असून, ओबीसी समाजाच्या एकजुटीच्या बळावर हा संघर्ष सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा प्रमाणपत्रांच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, कोणतीही मागणी कायद्याच्या चौकटीत राहूनच मान्य झाली पाहिजे. धमक्या देऊन, हिंसेला प्रवृत्त करणारी भाषा करून समाजाचे प्रश्न सुटत नाहीत.आवश्यक पुरावे आणि निकष पूर्ण करूनच आरक्षणाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. कोणी हातात कोयता, बंदूक घेण्याची भाषा करत असेल तर याचा बंदोबस्त करण्याचे काम सरकार आणि पोलिसांचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कायदा आणि सुव्यस्था राखण्याची जबाबदारी आहे. कायद्याच्या चौकटीत प्रमाणपत्र द्यावी अस वडेट्टीवार म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, समाजाच्या आणि तरुणांच्या आयुष्याशी खेळणे योग्य नाही. अनेक मराठा तरुणांना ओबीसी प्रमाणपत्र आधारावर नोकऱ्या मिळाल्या. भविष्यात त्या प्रमाणपत्रांबाबत कायदेशीर प्रश्न निर्माण होऊन त्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंसेची भाषा वापरून,धमक्या देऊन सरकारवर दबाव आणणे योग्य नाही.कायदेशीर मार्गाने त्यांनी आपल्या मागण्या मांडाव्यात, असे वडेट्टीवार म्हणाले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघावर टीका करताना विजय वडेट्टीवार म्हटले की, काही संघटना सरकारविरोधात स्पष्ट भूमिका घेऊ शकत नाहीत,कारण त्यांनी सरकारकडून लाभ घेतले आहेत. सरकारच्या भरवश्यावर ओबीसींच्या हक्काची लढाई लढता येणार नाही. ओबीसी महासंघाबाबत योग्य वेळी माहिती जाहीर करू असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here