Home वर्धा / भंडारा / गोंदिया / चंद्रपूर / गडचिरोली *अंगणवाडीतील बालकांच्या आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह*

*अंगणवाडीतील बालकांच्या आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह*

9
0

*अंगणवाडीतील बालकांच्या आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह*

*तपासणी अहवालाने धक्कादायक वास्तव समोर, दोषींवर कठोर कारवाईची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी*

चंद्रपूर, दि.९ : जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना पुरविण्यात येणाऱ्या गरम व ताज्या आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर बाबी समोर आली असून, यामुळे हजारो बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या आहाराची प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आली असता, काही खाद्यपदार्थ निर्धारित मापदंडानुसार नसल्याचे, तर काही पदार्थ सेवनासाठी असुरक्षित असल्याचे तपासणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणावर विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले.

महिला व बाल विकास विभागाच्या नागपूर विभागीय उपआयुक्त कार्यालयाने १८ जून २०२६ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना पाठविलेल्या पत्रासोबत प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर यांनी केलेल्या आहार तपासणीचे अहवाल जोडण्यात आले आहेत. या अहवालातून चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा येथील अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या काही खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

बालकांना दिला जाणारा आहार हा केवळ शासकीय योजनेचा भाग नसून त्यांच्या पोषणाचा, आरोग्याचा आणि सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे अशा आहाराच्या गुणवत्तेत गंभीर त्रुटी आढळणे ही साधी चूक नसून बालकांच्या आरोग्याशी खेळण्याचा गंभीर प्रकार असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

पत्रकार परिषदेत त्यांनी संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांच्या ताटात निकृष्ट अथवा आरोग्यास अपायकारक आहार कसा पोहोचला? याची जबाबदारी कोण घेणार? असा थेट सवाल सरकार आणि प्रशासनाला केला.

अंगणवाडीतील बालकांना सकस आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र, प्रयोगशाळेच्या तपासणीतच काही पदार्थ मापदंडांनुसार नसल्याचे आणि पदार्थ सेवनासाठी असुरक्षित असल्याचे आढळत असेल, तर संपूर्ण आहार पुरवठा व्यवस्थेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.

अंगणवाडीच्या माध्यमातून कुपोषणाविरोधात लढा देण्याचे सरकारचे धोरण असताना, त्याच अंगणवाडीतून पुरविला जाणारा आहारच जर गुणवत्तेच्या कसोटीवर अपयशी ठरत असेल तर शासनाच्या योजनांचा नेमका उपयोग काय, असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी प्रशासनाला संबंधितावर कारवाईची मागणी केली.
बालकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय राजकारणाचा नसून त्यांच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे अहवालातील प्रत्येक त्रुटीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

केवळ गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा या दोन तालुक्यांपुरती कारवाई न करता चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेची व्यापक तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आहाराचे नमुने नियमितपणे प्रयोगशाळेत तपासावेत, दोषी पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी आणि बालकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here