Home मुंबई *कोट्यवधींचा गोसेखुर्द उजवा कालवा वर्षातच भेगाळला* *अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदार मालामाल*

*कोट्यवधींचा गोसेखुर्द उजवा कालवा वर्षातच भेगाळला* *अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदार मालामाल*

10
0

*कंत्राटदार-अभियंत्यांना आमदार वडेट्टीवारांनी धरले धारेवर*

ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव परिसरातून जाणाऱ्या गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी वाया जात असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या वर्षभरातच कालव्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून काही ठिकाणी बांधकाम खचले आहे. त्यामुळे भर हंगामात शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचण्यास विलंब होत असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर विधीमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी भेट देऊन कालव्याची पाहणी केली. पाहणीदरम्यान निकृष्ट दर्जाचे बांधकाम उघडकीस आल्यानंतर त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि सिंचन विभागातील अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले.
दोन वर्षापासून गोसेखुर्द उजव्या कालव्यावरील ‘क्रिटिकल पॅचेस’च्या बांधकामासाठी एम.के.एस., बी आयपीएल, सरला या कंपनीला २३५ कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र काम पूर्ण करण्याची मुदत संपूनही आतापर्यंत अवघे १५ टक्के कामच पूर्ण झाले आहे. त्यातही झालेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे पाहणीत स्पष्ट झाल्याने संपूर्ण प्रकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कामाच्या संथ गतीमुळे आणि पाणी वेळेवर न मिळाल्याने यापूर्वी संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी संचालकांच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन केले होते. तरीही प्रशासनाने ठोस पावले न उचलल्याने शेतकऱ्यांचा रोष अधिकच वाढला आहे.

संबंधित कालव्याच्या पाहणीवेळी आमदार वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्यांच्या संगनमतामुळेच हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याशी खेळ केला जात आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळणार नाही.
तसेच त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, अभियंते आणि संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निकृष्ट काम करणाऱ्या एम.के.एस. कंपनीला तातडीने काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
यावेळी कार्यकारी अभियंता सुहास मोरे यांच्यासह सिंचन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा सविस्तर आढावा घेत तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना अखंड पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले. गोसेखुर्दसारख्या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पात निकृष्ट दर्जाचे काम, विलंब आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. असेही विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले. कालवा पाहणीच्या वेळेस काँग्रेस तालुका अध्यक्ष खेमराज तिडके,उपनगराध्यक्ष डॉ. नितीन उराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर,शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, सुधीर शिउरकर, संजय राऊत, विनोद बर्ले,यांचेसह काँग्रेस पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here