मुंबई, दि. ४ जुलै २६.
विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे वडील, थोर शिक्षण महर्षी, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने राजकीय, सामाजिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील एक उत्तुंग व बहुआयामी व्यक्तीमत्व गमावले आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची, देशाची तसेच काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, डॉ. डी. वाय. पाटील यांचे शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्र व काँग्रेस पक्षासाठी अनन्य साधारण योगदान लाभले आहे. महाराष्ट्रासह देशभर शैक्षणिक संस्थांची उभारणी करून अभियांत्रिकी, वैद्यकीयसह विविध प्रकारच्या शिक्षणाची दारे त्यांनी सर्वसामान्यांना खुली केली. कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावातून आलेले डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून ग्रामीण भागातील मुलांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शिक्षण संस्था उभारल्या. त्यांनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन आज हजारो तरुण तरुणींनी यशाला गवसणी घातली आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा, राजकीय, सामाजिक व सांस्कृतीक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून केली, नगरसेवक, आमदार ते राज्यपाल असा त्यांचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

















