Home मुंबई *म्हाडाचे घर’ दाखवून 29 लाखांचा डल्ला? बनावट कागदपत्रे, खोटी आश्वासने आणि ‘स्टॉप...

*म्हाडाचे घर’ दाखवून 29 लाखांचा डल्ला? बनावट कागदपत्रे, खोटी आश्वासने आणि ‘स्टॉप पेमेंट’चा खेळ; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा दाखल*

10
0

‘ *म्हाडाचे घर’ दाखवून 29 लाखांचा डल्ला? बनावट कागदपत्रे, खोटी आश्वासने आणि ‘स्टॉप पेमेंट’चा खेळ; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा दाखल*

मुंबई | विशेष प्रतिनिधी

“म्हाडाचे घर मिळवून देतो” या गोड आमिषाला बळी पडलेल्या एका निवृत्त बँक अधिकाऱ्याची तब्बल 29 लाख रुपयांची कथित फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास सहा वर्षे आश्वासनांची गाजरे दाखवत अखेर धनादेशांवरही ‘स्टॉप पेमेंट’ करून फिर्यादीची रक्कम बुडवल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0398/2026 दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सूर्यकांत रघुनाथ म्हसकर हे बँक ऑफ बडोदाचे निवृत्त हेड कॅशियर असून, त्यांच्या तक्रारीनुसार किन्नरी ठाकूर, अनिल आगवणे आणि नागदेव भार्गव राणे यांनी संगनमत करून प्रभादेवी येथील म्हाडाच्या सदनिकेचे आमिष दाखवले. फिर्यादी व त्यांच्या पत्नीचा विश्वास संपादन करण्यासाठी नोटरीकृत एमओयू करण्यात आला, विविध कागदपत्रे तयार करण्यात आली आणि म्हाडाच्या कार्यालयात नेऊन अधिकाऱ्यांची भेट घडवून आणल्याचेही एफआयआरमध्ये नमूद आहे.

तक्रारीनुसार, नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2023 या कालावधीत चेक आणि आरटीजीएसद्वारे एकूण 29 लाख रुपये संबंधितांना देण्यात आले. सुरुवातीला एका वर्षात सदनिका मिळेल, अशी ग्वाही देण्यात आली. मात्र, वेळोवेळी कोरोना, निवडणुका, अधिकाऱ्यांच्या बदल्या, राजकीय संपर्क अशा विविध कारणांची ढाल पुढे करून व्यवहार लांबवत नेल्याचा आरोप आहे.

दरम्यान, फिर्यादींच्या पत्नीच्या नावाने म्हाडाकडे कथितपणे खोटी माहिती असलेले अर्ज सादर करण्यात आल्याचाही गंभीर आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. “तुम्हाला सदनिका मिळण्यासाठी असे अर्ज आवश्यक आहेत,” असे सांगून स्वाक्षऱ्या घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सदनिका मिळण्याची सर्व आशा संपल्यानंतर फिर्यादींनी पैसे परत मागितले असता, आरोपींनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे चार पोस्ट-डेटेड धनादेश दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, जानेवारी 2026 मध्ये हे धनादेश बँकेत भरल्यानंतर ते “स्टॉप पेमेंट” या कारणाने न वटल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे. यानंतरही व्हॉट्सअॅप संदेशांद्वारे “आणखी थोडा वेळ द्या, आम्ही प्रामाणिकपणे पैसे परत करू,” अशी विनवणी करण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

विशेष म्हणजे, या संपूर्ण व्यवहारात फिर्यादींना म्हाडा कार्यालयात नेऊन एका अधिकाऱ्याची भेट घडवून देण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण व्यवहार अधिकृत असल्याचा विश्वास निर्माण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधितांचे कार्यालय बंद झाले आणि पैसेही परत मिळाले नाहीत, असे फिर्यादींचे म्हणणे आहे.

या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 मधील फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, खोटी कागदपत्रे वापरणे, अपहार, बनावटपणा आणि संगनमत यांसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अंकुश चौगुले यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे—म्हाडाच्या नावाने सर्वसामान्यांची स्वप्ने विकणाऱ्या कथित दलालांचे जाळे नेमके किती मोठे आहे? अशा प्रकारे जर निवृत्त अधिकारीही फसवले जात असतील, तर सामान्य नागरिकांची सुरक्षा कोण करणार? तपासातून सत्य बाहेर येईलच; मात्र, म्हाडाच्या नावावर सुरू असलेल्या अशा कथित व्यवहारांवर कठोर कारवाई होणे ही काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here